‘रईस’ स्टाइलने ड्रग्ज तस्करांचा चालतो धंदा; करीना, कटरिना, ऑडी, टीनएजर या नावाने कोडवर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:17 AM2023-10-13T10:17:19+5:302023-10-13T10:18:07+5:30
ललितचा सप्लाय परदेशातही....
- नितीश गोवंडे
पुणे : अम्मी जान कहती थी, कोई धंदा छोटा नहीं होता और धंदे से बड़ा कोई धर्म नहीं होता... या रईस चित्रपटातील डायलॉगप्रमाणेच अमली पदार्थाचा धंदा चालवला जातो. या चित्रपटात शालेय मुलांच्या दप्तरातून दारूची तस्करी केली जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातदेखील अल्पवयीन मुलांमार्फत ड्रग्जचा पुरवठा ग्राहकापर्यंत केला जात असल्याची माहिती शहरातील निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रस्त्यावर भीक मागणाऱ्या अथवा गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलांना थोड्याशा पैशांचे आमिष दाखवत हा धंदा चालवला जातो. अल्पवयीन मुले असल्याने कुणालाही संशय येत नाही, त्यामुळे या ड्रग्ज तस्करांचे काम फत्ते होते.
ललित पाटीलने ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवल्याचे उघडकीस आल्यानंतर हे ड्रग्ज रॅकेट नेमके कसे चालते? याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार ललित रुग्णालयात दाखल असताना तरुणांची मोठी गर्दी ससून परिसरात होत होती; पण ही गर्दी कशामुळे होत आहे?, हे त्यावेळी कुणाच्याही लक्षात आले नाही. ललित पाटील याने केलेल्या पलायनानंतर अनेकांना यामागचे कारण समजल्याचे त्यांनी सांगितले; पण मुळात ससून प्रशासनासह पोलिसांना मात्र याची कोणतीच खबर न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ललितचा सप्लाय परदेशातही...
ललितचा भाऊ भूषण पाटील हा एमडी हे ड्रग्ज बनवायचा तर त्याचा सप्लाय ललित करत होता. महाराष्ट्रासह परराज्यातदेखील त्याचे ग्राहक होते. यांसह मलेशिया, थायलंड आणि दुबईमध्येदेखील ललित ड्रग्ज सप्लाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.
नशेखोरांपर्यंत कसे पोहोचते ड्रग्ज?
शहरातील मोठ्या संख्येने युवा वर्ग या अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. शहरात शिकण्यासाठी अथवा नोकरीसाठी आलेल्या परराज्यातील युवकांसह विदेशातील तरुणांकडून अमली पदार्थाला मोठी मागणी असते. हे ड्रग्ज कोडवर्डने विकले जाते, तसेच ‘अ’ नावाची व्यक्ती ‘ब’ला ड्रग देते, ‘ब’ हा ‘क’ ला माल नेऊन देतो, त्यानंतर तीन अन्य लोकांद्वारे पॅकेट नशेखोरांपर्यंत पोहोचते. यामध्ये प्रामुख्याने सहा लोकांची चेन असते; पण ते लोक एकमेकांना ओळखत नसल्याने या रॅकेटचा पर्दाफाश होण्यास खूप वेळ लागतो.
म्याऊ-म्याऊ, बुक नावाने एमडीची विक्री...
देशात १० पेक्षा अधिक ड्रग्जच्या प्रकाराची विक्री होते. यामध्ये प्रत्येक ड्रग्जला वेगवेगळ्या नावाने सांकेतिक शब्द (कोडवर्ड) दिलेले असतात. सध्या अमली पदार्थांच्या बाजारात एमडी बुक, साधा कपडा नावाने विकला जातो. पूर्वी म्याऊ-म्याऊ नावाने विकला जात होता. (एमडीचे सेवन केल्यावर डोळ्याची बुब्बुळे मोठी दिसतात, त्यामुळे म्याऊ-म्याऊ हा कोडवर्ड प्रचलित आहे.) याशिवाय एमडीला पूर्वी करीना कपूर नावानेदेखील बोलले जायचे. या ड्रग्जचे सेवन केल्यावर झिरो फिगर होते, असा अपप्रचार झाल्याने त्या नावाने एमडी विकले जात होते.
देवांच्या नावाने ‘ड्रग्ज’ची विक्री...
अनेकदा देवांच्या नावानेदेखील ड्रग्जची विक्री होत असते. यामध्ये भाई, एक शिवा, दो बुद्धा, लॉर्ड शिवा, या नावांचा समावेश आहे. यासह कोकेनला कटरिना, बेबो, ऑडी, टीएनजर, टॅक्सी या नावाने, एमडीएमएला ब्ल्यू कीस आणि आदम नावाने मागितले/विकले जाते.
असे पोहोचवले जातात अमली पदार्थ...
अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे व्हॉट्सॲप ग्रुप अथवा सोशल मीडियावर सांकेतिक भाषा वापरून पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत फिल हाय आणि ट्रान्समध्ये नेण्यासाठी कोकेन, केटामाइन आणि टूसीबीसारखे अमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुण पिढी लाखो रुपयांची उधळण करते. काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये अमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठ-मोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कुरिअरच्या माध्यमातून तस्कर हे अमली पदार्थ पार्टीत आणतात. ललितदेखील ससून रुग्णालयातून जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेहमी जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेवरून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांना देतात असा चकवा...
केमिकल ड्रग्ज वेगळे करण्याचे काम कोणत्या कारखान्यात सुरू आहे, याचा शोध लावणे अवघड असते. या औषधांच्या खपात अनपेक्षितपणे वाढ झाल्यास त्या ठिकाणी छापा टाकून तस्करांचा छडा लावला जातो. मात्र, डॉक्टर शॉपिंग या नव्या कार्यप्रणालीचा वापर करून तस्कर एकाच विभागातील दुकानांतून प्रतिबंधित औषधे न घेता शहरातील विविध दुकांनातून खरेदी करत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अमली पदार्थविरोधी पथकाला कठीण जाते.
एमडीचे सेवन कसे होते?
एमडी हा अमली पदार्थ पावडर स्वरूपात असतो. त्यामध्ये बारीक (फाइन) पावडर असल्यास तो नाकाने ओढला जातो, अन्यथा पान मसाल्यांमध्ये टाकून खाल्ला जातो. यासह सुंदर दिसण्यासाठी व तासन् तास नाचण्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर केला जातो.
तरुण कसे अडकतात जाळ्यात..
एमडीच्या सेवनामुळे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करू शकता, त्वचा सतेज राहते अशा भूलथापांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी बळी पडतात. त्यातील सुंदर मुलींना हेरून विक्रेते त्यांना मोफत एमडी पुरवतात. काही काळाने त्याचे व्यसन लागले की त्यांना या ड्रग्जच्या विक्रीत गुंतवतात. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीने ते इतर विद्यार्थ्यांना या नशेच्या जाळ्यात ओढतात. शाळेतील मुलांना हेरण्यासाठी टॉफी व चॉकलेटमध्येही अमली पदार्थ भरून त्याला हे व्यसन लावण्यात येते. आज सर्वाधिक प्रमाणात एमडीचे सेवन तरुण पिढी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रग्ज हे स्लो पॉयझन आहे. सुरुवातीला शरीरात ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतर मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा असे आजार जडतात. त्यानंतर अगदी तडफडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होतो.
ड्रग्जच्या आहारी कोण गेले ओळखायचे कसे?
ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली मुले अधिक निष्काळजी बनतात. ते त्यांच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. अनेकदा तर आंघोळही करण्याचे टाळतात. हे लोक एकांतात राहणे पसंत करतात. कुटुंबीय, इतर नातेवाइकांपासून दूर राहतात. जुने मित्र सोडून त्यांच्यासारख्याच ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या मुलांसोबत मैत्री करतात. स्वभाव देखील अत्यंत चिडचिडा होतो.