बाणेर परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणारा ताब्यात; साडेचार लाखांचे २२ ग्रॅम कोकेन जप्त
By भाग्यश्री गिलडा | Published: May 12, 2023 04:17 PM2023-05-12T16:17:40+5:302023-05-12T16:18:33+5:30
बाणेर येथील युथिका सोसायटीजवळील रस्त्यावर परदेशी नागरिक कोकेन विकण्याचा कट रचत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती
पुणे: पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेल-१ ने बाणेर परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या ४३ वर्षीय परदेशी नागरिकाला पकडण्यात यश मिळवले आहे. संशयिताकडे साडेचार लाख रुपये किमतीचे २२ ग्रॅम कोकेन सापडले. या कारवाईत ५० हजार रुपये किमतीची एक दुचाकी, १७ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन आणि ५४ हजार ५०० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाणेर येथील युथिका सोसायटीजवळील रस्त्यावर परदेशी नागरिक कोकेन विकण्याचा कट रचत असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई पांडुरंग पवार आणि सचिन माळवे यांना मिळाली. यांनतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून संशयिताला पकडले. सुस रोड येथे राहणारा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक ट्रेवर बेंजामिन नोहा या आरोपीविरुद्ध चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, तसेच पोलीस कर्मचारी मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे, नितेश जाधव यांचा समावेश होता.