अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण टोळीतील आरोपींना अटक; पुणे पोलिसांची कारवाई
By नम्रता फडणीस | Published: November 16, 2023 08:09 PM2023-11-16T20:09:16+5:302023-11-16T20:09:51+5:30
या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
नम्रता फडणीस
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण टोळीतील आरोपी इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला ईस्ट येथून तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला भोईसर मुंबई येथून बुधवारी (दि. १५) पुणे पोलिसांनी अटक केली. या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या
आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
या सर्व आरोपींना मोक्का न्यायालयात हजर केले असता आरोपींना दि. २० नोव्हेम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले .
हरिश्चंद्र पंत याने शिंदे गाव एम आयडीसी नाशिक येथे सुरु केलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये आरोपी ललित पाटील आणि अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून फॅक्टरी मध्ये प्रशिक्षण उत्पादन आणि विक्री मध्ये
सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे तर इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान याला आरोपींनी नाशिक येथे उत्पादित केलेल्या मेफेड्रोनची मुंबई येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंदकुमार लोहारे आणि प्रज्ञा कांबळे यांना येरवडा कारागृहातून तसेच रेहान उर्फ गोलू याला तळेजा कारागृह, जिशान इकबाल शेख याला आर्थर कारागृहातून
प्रॉडक्शन वॉरंटद्वारे पुन्हा ताब्यात घेतले.
या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी युक्तिवाद केला की तपासा दरम्यान या आरोपींकडून मेफेड्रोनची बाजार भाव प्रमाणे किंमत दोन कोटी चौदा लाख तीस हजार सहाशे एवढी असून, या अमली पदार्थाच्या विक्रीतून आरोपींनी आठ किलो सोन्याची बिस्किटे चार चाकी गाड्या व महागडे मोबाईल हँडसेट असा एकूण 5 कोटी अकरा लाख 45 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज खरेदी केलेला आहे असे निष्पन्न झाले आहे. टोळीप्रमुख अरविंदकुमार लोहारे हा एमएससी केमिस्ट्री उच्चशिक्षित असून, त्याने पेट्रोल अमली पदार्थ तयार करण्याचा फॉर्म्युला व प्रशिक्षण इतर टोळी सदस्यांना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती नाशिक नगर, मुंबई आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये झाली असल्याची सकृत दर्शनी दिसते. याशिवाय राज्याबाहेर या टोळीने या अमली पदार्थाची विक्री केली किंवा कसे याबाबत तपास करायचा आहे. पुण्याची व्याप्ती व क्लिष्टता लक्षात घेता आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर न्यायालयाने सर्व आरोपींना दि. २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली.
आरोपींना पुण्यातही उघडायचा होता अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना नाशिकप्रमाणेच पुण्यातही आरोपींना अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उघडायचा होता अशी माहिती तपासातून समोर येत आहे. आरोपींचे ड्रग्स रॅकेट वेळीच समोर आल्याने त्यांचा डाव फसला असल्याचे वकिलांनी सांगितले.
प्रज्ञा कांबळे हिचा जामीन फेटाळला
एमडी विक्रीतील पैशातून वेळोवेळी ललित पाटील, अभिषेक बलकवडे आणि भूषण पाटील यांनी तिला उदरनिर्वाहासाठी तसेच चारचाकी, मोबाईल घेण्यासाठी कॅश आणि अकाउंटवर पैसे दिले होते. आरोपी भूषण पाटील याच्या मोबाईलमध्ये जिशान शेख व प्रज्ञा कांबळे या दोघांचे एमडी फॅक्टरी व इतर बाबींवरील संभाषण
पोलिसांना प्राप्त झाले आहे. मोक्का अंतर्गत तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.