पुण्यात ड्रग्जचा कारखाना, २२०० कोटींचे एमडी जप्त; दिल्लीतही पोलिसांची मोठी कारवाई
By विवेक भुसे | Published: February 20, 2024 08:11 PM2024-02-20T20:11:14+5:302024-02-20T20:11:58+5:30
कुरकुंभीत लॅब : विश्रांतवाडीतील गोदामात रांगोळी, मीठासोबत केला होता साठा...
पुणे :पुणे शहर पोलिस दलाने गेल्या दोन दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे केलेल्या कारवाई करुन तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे ११०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. गुन्हे शाखेच्या एका पथकाने दिल्लीत कारवाई करुन ४०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
गुन्हे शाखेने सोमवारी सराईत गुन्हेगार वैभव ऊर्फ पिंट्या माने व त्याच्या साथीदारांना पकडून साडेतीन कोटींचे एमडी ड्रग्ज पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन विश्रांतवाडी येथील भैरव नगर मध्ये असलेल्या एका गोदामामधून ५५ किलो ड्रग्जचा साठा आढळून आला. त्यानंतर दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम या कारखान्यावर छापा घातला. या ठिकाणी एमडीची निर्मिती केली जात होती. येथून पोलिसांनी जवळपास ६०० किलोपेक्षा अधिक एम डी जप्त केले आहे. पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार येथे १८०० किलोची निर्मिमीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सहभागी आहेत. आजवर पकडण्यात आलेल्या एमडी पैकी हे सर्वात सुपर फाईन क्वालिटीचे एमडी असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुरकुंभ येथे तयार केलेले ड्रग्ज मुंबई, मीरा भाईंदर, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि नेपाळ मार्ग परदेशात पाठविले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेची पथके वेगवेगळ्या राज्यात रवाना झाली आहेत. त्यातूनच नुकतीच दिल्ली येथे कारवाई करुन ४४० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कुरकुंभमधील अर्थकेम लॅबोरेटरीजमध्ये निर्मिती
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत औषध निर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. हैदर शेख यांच्या विश्रांतवाडी येथील गोदामामधून ५५ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या गोदामामध्ये मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आलेला होता. पांढऱ्या क्रिस्टल्स प्रमाणे दिसणारे मेफेड्रोन हे छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून ही पाकिटे मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती.
पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात पहाटे तीन वाजल्यापासून कुरकुंभ येथील कारखान्यावर कारवाई सुरु केली. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील अनिल साबळे नावाच्या व्यवसायिकाची ही कंपनी असल्याचे समोर आले आहे. २० गुंठे क्षेत्रात २००६ मध्ये ही कंपनी सुरु करण्यात आली. तेथे ४० कामगार काम करतात. ऑक्टोबर २०२३ पासून कंपनीत मेफेड्रोनचे उत्पादन सुरु करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. डोंबिवली येथील एका व्यक्तीने साबळे याला एमडी तयार करण्याची ऑर्डर दिली आहे.
पोलिसांनी कंपनी मालक साबळे आणि त्याच्यासाठी एम.डी.चा फॉर्म्युला तयार करणार्या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान कंपनीतून पुणे शहर, दिल्ली, मुंबई, मिरा-भाईंदर, बंगलोर आणि हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत एमडीची पुरवाठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना झाली आहेत.
साबळे याच्या कंपनीत लोखंडाला गंज लागू नये म्हणून पेंटमध्ये टाकण्यासाठी लागणारे केमिकल आणि मलेरिया विरोधात लढणार्या औषधामध्ये लागणारे संयुग (कंम्पोनंट) तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र त्याने या दोन उद्योगाच्या आडून एमडी या ड्रग्जची निर्मिती करण्याचा उद्योग थाटला होता. तर यापुर्वी पोलिसांनी हैदर शेख, वैभव माने,अजय करोसिया या तिघांना अटक केली आहे. हैदर हा या तिघांपैकी प्रमुख असून, त्याने माने याच्यासोबत मिळून एमडी तस्करीचा मीठ विक्रीच्या आडून उद्योग थाटला होता. मात्र पोलिस कर्मचारी विठ्ठल साळुंखे यांना याबाबतची माहिती मिळाली, आरोपींना पोलिस कर्मचारी निलेश साबळे, दत्ता सोनावणे, अभिनव लडकत यांनी ओळखले.
कुरंकुभ मध्ये तिसरा कारखाना उघडकीस
यापूर्वी २०१७ साली कुरकुंभ येथील समर्थ लॅब व सुजलाम या कंपनीत मेफेड्रींन (एम डी) साठा जप्त करण्यात आला होता.