पार्सलमध्ये ड्रग्ज; तरुणीला २२ लाखांचा गंडा, क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगून दाखवली भीती
By भाग्यश्री गिलडा | Published: April 22, 2024 04:05 PM2024-04-22T16:05:00+5:302024-04-22T16:08:03+5:30
नागरिकांना असा काही फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा
पुणे : फेडेक्स कुरुयार कंपनीमधून तुमच्या नावाने मुंबईवरून पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर आधी कुरिअर ऑफिसमधून आणि नंतर मुंबईहून आरबीआयचे अधिकारी बोलत असल्याचे सांगत तरुणीला २२ लाखांचा चुना लावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी घडला आहे. याबाबत वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फेडेक्स कुरियरमधून बोलत आहे. तुमच्या नावाने मुंबई येथून पार्सल पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये साडेसहा ग्रॅम ड्रग्ज आहेत. तसेच १ लॅपटॉप, ५ पासपोर्ट, दोन क्रेडिट कार्ड आणि कपडे असा मुद्देमाल आहे. त्यामुळे मुंबई क्राईम ब्रांच येथे तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच पोलिसांना तक्रार करा. तुमचा कॉल मुंबई आरबीआयला जोडून देतो असे सांगितले. तरुणीने होकार दिल्यावर आरबीआयमधून अधिकारी बोलत असल्याचा बनाव केला. तुमचे आधार कार्ड दहशतवादामध्ये वापरले गेले आहे. खाते व्हेरिफाय करण्यासाठी एक लिंक पाठवली. त्यावर तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम आरबीआयच्या बँक खात्यावर पाठवा त्याची चौकशी करून आम्ही तुम्हाला ती परत पाठवू, असे सांगितले. चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे तरुणीने भीतीपोटी एकूण ६ लाख रुपये पाठवले. त्यानंतर तिच्या बँक खात्याच्या खाजगी माहितीचा वापर करून सायबर चोरट्यांनी १६ लाखांचे लोन काढून घेत तिची एकूण २२ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेजितवाड पुढील तपास करत आहेत.
आधी ६ लाख उकळले मग तरुणीच्या खात्यावर पर्सनल लोन काढून १६ लाख हडपले तरुणीच्या फिर्यादीप्रमाणे, भीतीपोटी तरुणीने ६ लाख रुपये सायबर चोरट्यांना ट्रान्स्फर केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी मोबाईलचा ताबा आणि खासगी माहिती चोरून तरुणीच्या बँक खात्यावर असलेले १६ लाख रुपयांचे प्री- अप्रुव्हड लोन परसपर ट्रान्स्फर करून घेतले.
तत्काळ तक्रार केली मात्र २ महिन्यांनी गुन्हा दाखल
तरुणीने 'लोकमत'शी बोलतांना सांगितले की, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने १९३० या सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर तक्रार नोंदवली. तसेच त्याच दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार सुद्धा दिली. मात्र पोलिसांनी रविवारी (दि. २१) गुन्हा दाखल केला आहे. यादरम्यानच्या काळात पोलिसांकडून "वेळकाढूपणा" आणि कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नसल्याची तक्रार तिने केली आहे.
तुम्हाला असा फोन आला तर काय कराल?
- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.
- असा फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा.
- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.