तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 8, 2024 14:33 IST2024-05-08T14:33:02+5:302024-05-08T14:33:49+5:30
अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल

तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज! वृद्धेला २ कोटींचा गंडा
पुणे : तुमच्या नावाने मुंबई येथून पाठवलेले पार्सल कस्टममध्ये अडकले आहे, त्याचे संबंध दहशतवादाशी आहेत, असे म्हणत एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महिलेने मंगळवारी (दि. ७) सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, हा प्रकार २६ एप्रिल ते ६ मे या कालावधीत घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर फेडेक्स कुरिअर ऑफिसमधून आकाशकुमार बोलत असल्याचे सांगत तुम्ही पाठवलेले पार्सल हे कस्टममध्ये अडकले आहे. पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याने तुमच्या नावे मुंबईच्या एनसीबी डिपार्टमेंटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर एक अप्लिकेशन डाउनलोड करा असे सांगितले. त्यानंतर खाते व्हेरिफाय करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेतली. तसेच बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी तुमच्या खात्यातील सगळे पैसे दिलेल्या बँक खात्यात पाठवा असे सांगितले. महिलेने सायबर चोरट्यांच्या सांगण्यावरून तब्बल २ कोटी ८० हजार रुपये सायबर चोरट्यांच्या बँक खात्यावर पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे- पाटील पुढील तपास करत आहेत.