Pune Police: पुण्यासह इतर राज्यातील तब्बल ५ हजार कोटींचे ड्रग्स जप्त; पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:44 PM2024-10-11T12:44:20+5:302024-10-11T12:45:14+5:30
राज्याबाहेर जात ड्रग्सची पाळेमुळे खणून काढत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला
किरण शिंदे
पुणे: पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त आणि त्यांच्या टीमला राज्य सरकारकडून २५ लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आले. अमोल झेंडे आणि त्यांच्या पथकाने ड्रग्ज प्रकरणात धडाकेबाज कारवाई केली होती. गुन्हे शाखेच्या तत्कालीन टीमने तेव्हा पुण्यासह दौंडजवळील कुरकुंभ, सांगली जिल्ह्यातील कुपवाड, दिल्ली, बिहारमधील पटना, पश्चिम बंगाल येथे कारवाई करत तब्बल ५ हजार कोटींहून अधिक किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते.
ड्रग्स कारवाईला सुरुवात झाली ती ललित पाटील प्रकरणापासून. ड्रग तस्कर ललित पाटील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना तो उपचारासाठी
ससून रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने रुग्णालयातूनच ड्रग्स रॅकेट चालवले होते. तत्कालीन डीसीपी अमोल झेंडे आणि त्यांच्या पथकाने ससून रुग्णालय परिसरात छापेमारी करत हे ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलं होतं.यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होण्यापूर्वीच ललित पाटील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या मदतीने पळाला होता. या प्रकरणाची तेव्हा देशभरात चर्चा झाली होती.
दरम्यान ड्रग्स माफिया पळून गेल्याने पुणे पोलिसांवर टीकेचा भडीमार होऊ लागला होता. तेव्हा गुन्हे शाखेचे तत्कालीन डीसीपी अमोल झेंडे आणि त्यांच्या पथकाने अनेक शहरात राज्याबाहेर जात ड्रग्सची पाळेमुळे खणून काढली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेव्हा दिल्ली, पश्चिम बंगाल, पाटणा येथे जाऊन मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त केला होता.
गुन्हे शाखेच्या याच कामगिरीची दखल आता राज्य शासनाने घेतली आहे. ही कामगिरी करणाऱ्या गुण शाखेच्या पथकाला शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हा निधी पोलीस महासंचालक यांनी पोलीस आयुक्त यांना वितरीत करावा आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईबाबत कामगिरची नोंद घेऊन ही रक्कम पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना देण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.