नऊ गावात ढोल बजावो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:52+5:302021-08-18T04:14:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील रस्ते मजबूत डांबरी रस्त्याने जोडले जाणे आवश्यक आहे, सध्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील रस्ते मजबूत डांबरी रस्त्याने जोडले जाणे आवश्यक आहे, सध्या पावसाळ्यात अनेक रस्त्यांचे नुकसान झाले आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी किसानसभेच्या वतीने नऊ गावांमध्ये ढोल बजावो आंदोलन करण्यात आले.
तालुक्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण हे मोठे आहे. दरड कोसळणे अतिवृष्टी होणे, ढगफुटी होणे यासारखे प्रकार पावसाळ्याच्या काळात वारंवार होत आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील आजही अनेक वाड्या-वस्त्या व गावे, कच्च्या सडकेने किंवा पारंपरिक पायवाटेने एकमेकांशी जोडलेली आहेत.
अशा ठिकाणी भविष्यात काही नैसर्गिक आपत्ती झाली तर मदत यंत्रणा सुद्धा पोहोचवणे अवघड जाईल. यासाठी तालुक्याच्या आदिवासी भागातील काही रस्ते विशेष बाब म्हणून डांबरी सडकेने एकमेकांशी जोडणे आवश्यक आहे. हे रस्ते पक्के व्हावेत यासाठी सदरील गावांच्या ग्रामपंचायत व किसान सभेने वारंवार प्रशासनाकडे मागणी व पाठपुरावा केलेला आहे.
परंतु, प्रशासनाने अद्यापही या मागण्यांकडे लक्ष दिले नाही, या पार्श्वभूमीवर सुमारे नऊ गावांमध्ये ढोल वाजवून निषेध व्यक्त केला. प्रशासनाने या रस्त्यांची कामे त्वरित सुरू न केल्यास किसानसभेच्या वतीने, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सोमवार, दि.२३ ऑगस्ट रोजी बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याच इशारा किसान सभेने निवेदनाव्दारे आदिवासी विकास विभाग, तहसीलदार, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता बांधकाम विभाग, पंचायत समिती व सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव यांना दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी याचबरोबर तालुका कार्यकारिणी सदस्य दत्ता गिरंगे, अशोक जोशी, अनिल सुपे, दत्ता गवारी, रामभाऊ भांगे, कुमार वालकोळी, दीपक वालकोळी, संदीप केवाळे, तुकाराम भांगरे यांनी केले.