ढोलताशा पथके जोमात; बँड कोमात! पारंपरिक कलाकारांवर उपासमारीची वेळ
By अजित घस्ते | Published: August 29, 2022 04:21 PM2022-08-29T16:21:09+5:302022-08-29T16:21:29+5:30
परंपरागत बँड पथकांची जागा ढाेलताशा पथकांनी घेतल्याने पारंपरिक कलाकारांवर यंदाही उपासमारी ओढत असल्याचे कलाकार सांगत आहेत
पुणे : कोरोना संकटामुळे तब्बल दाेन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील गणेश मंडळे उत्सवाची तयारी करीत आहेत. असे असले तरी परंपरागत बँड पथकांची जागा ढाेलताशा पथकांनी घेतल्याने पारंपरिक कलाकारांवर यंदाही उपासमारी ओढत असल्याचे कलाकार सांगत आहेत.
पूर्वी गणेशाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत बँड पथकांना प्रचंड मागणी असायची. सध्या ही जागा ढोल पथकांनी बळकावली आहे. त्यामुळे शहरात ढोलताशा पथके वाढली असून, तुलनेने बँड पथके लुप्त होत आहेत. आजची स्थिती पाहता शहरात सध्या ६० ते ७० बँड पथके आहेत, तर २०० ते २५० ढोलताशा पथके आहेत. या ढोलताशा पथकांत सुशिक्षित तरुण आणि मुलींची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे फरक
- बँड पथकांतील कलाकारांची संख्या १५ ते २० असून, या कलाकारांना पगार द्यावा लागताे.तर
- ढोलताशा पथकांमध्ये मात्र उत्स्फूर्तपणे तरुण वर्ग माेठ्या संख्येने सहभाग घेतात. तसेच त्यांना मानधनाचीही अपेक्षा नसते.
- मिरवणुकीसाठी ढाेल-ताशा पथक गणेश मंडळांकडून ताशी २५ हजार ते एक लाखापर्यंत मानधन घेतात.
- याउलट बँड पथकाची स्थिती आहे, मानधनापेक्षा खर्च जास्त हाेत आहे. बँड पथकांना कलाकार जपणे, त्यांना पगार देणे अवघड होत आहे. कलाकारांचा पगार, त्यांच्या कलेला वाव मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे बँड पथकांची संख्या कमी होत चालली आहे.
बँड पथकांपुढील आव्हाने
- बँड पथकांकडून कलाकारांना रोजंदारीवर पगार दिला जातो. यांना सण-उत्सव काळातच मागणी असते. इतर वेळेत काम नाही.
- लग्नसमारंभात सध्या वाजवण्यास परवानगी नाही. कलाकारांना वाव नाही, त्यामुळे कलाकार कमी होत आहेत. यासाठीचे कलाकार मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या भागांतून येत आहेत.
- सध्या मराठवाडा, विदर्भ भागांतील कलाकार बँड वाजवत आहेत. त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी गणेश मंडळांनी प्रयत्न केले पाहिजेत.
ढोलताशा पथके वाढत असल्याने बँड पथकांची मागणी कमी
गोविंदा बँड पथकाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असायची. सध्या शहरात ढोलताशा पथके वाढत असल्याने बँड पथकांची मागणी कमी होत आहे. कलाकारांचे हातावर पोट असते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न येत आहे. याउलट स्थिती ढोलताशा पथकांची आहे. त्यांना मागणी चांगली आहे. विशेष म्हणजे त्यांना वाद्य वाजवणाऱ्यांना पगार द्यावा लागत नाही, आम्हाला मात्र कलाकारांना सांभाळावे लागते. - सुनील ओव्हाळ, गोविंदा बँडपथक, पद्मावती
शहरात फक्त ६० बँड पथके
सध्या ढोलपथके वाढल्याने बँड पथकांची संख्या कमी होत आहे. शहरात फक्त ६० बँड पथके आहेत. गणेश आगमनापासून ते विसर्जनापर्यंत कामाच्या दर्जानुसार बँड पथकाला मागणी असायची. सध्या बँड पथके चालवणे अवघड झाले आहे. आमच्या बँडला कामाच्या दर्जानुसार मागणी आहे. - अमोद सोलापूरकर, प्रभात बँड