मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं पडलं महागात; नववर्षाच्या पहिल्याच रात्री मोटार बुडाली धरणात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 08:14 PM2023-01-02T20:14:09+5:302023-01-02T20:14:18+5:30
वाहनासह जलाशयात गेलेल्या या तीन लोकांनी वाहनाच्या काचा फोडून आपली सुटका करून घेतली
राजगुरुनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान धरण जलाशयात चारचाकी मोटार बुडाल्याचे सोमवारी सकाळी आढळले. रविवारी (दि.१) नववर्षाच्या पहिल्याच रात्री हि घटना घडली असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. वेताळे-साकुर्डी (ता.खेड) रस्त्यावरील चासकमान धरणातील चाळीसगाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ हि घटना घडल्याचे दिसून आले. परंतु हा प्रकार नक्की घातपात की अपघात, याचा शोध खेड पोलीस घेत आहेत.
सोमवारी सकाळी चासकमान धरणाच्या जलाशयात पांढऱ्या रंगाची इको मोटार बुडाल्याचे खेड पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी या वाहनात कोणीही नव्हते. धरण जलाशय परिसरातील एका खासगी रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना साकुर्डी रस्त्यावरून हे वाहन धरण जलाशयात कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातावेळी वाहनात तीन लोक होते. वाहनासह जलाशयात गेलेल्या या तीन लोकांनी वाहनाच्या काचा फोडून आपली सुटका करून घेतल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत. परंतु स्वतः मद्यधुंद अवस्थेत असताना त्यात वाहन पाण्यात बुडालेले असताना वाहनाच्या काचा फोडून सुटका केलीच कशी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे. डोंगर, पाणी व झाडाझुडपांच्या परिसरात दिवसा तुरळक वर्दळ असते, तर रात्रीच्या वेळी हा परिसर पुर्णतः निर्जन असतो.