प्रेमविवाहानंतर दारूच्या नशेत पत्नीला मारहाण; पतीला चढवली न्यायालयाची पायरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 03:47 PM2022-12-19T15:47:18+5:302022-12-19T15:47:28+5:30
पत्नीला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश
पुणे : ‘ती’ने वयाच्या अठराव्या वर्षी घरच्यांचा विरोध पत्करुन पळून जाऊन त्याच्याशी प्रेमविवाह केला. पतीला तंबाखू व दारुचे व्यसन असल्याने तो दारुच्या नशेत तिला मारायचा.. तब्बल बारा वर्षे तिने तग धरत संसार केला. पण शेवटी असहय झाल्याने अखेर ’ती’ ने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत फौजदारी अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत पत्नीला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. तापडिया यांनी हा आदेश दिला.
माधव आणि सीमा (नाव बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. सीमा यांनी अँड अनघा काळे यांच्यामार्फत याबाबत अर्ज दाखल केला होता. या जोडप्याचा प्रेमविवाह झाला आहे. सीमाचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी माधव यांच्याशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. संसार थाटल्यानंतर पतीला तंबाखू आणि दारुचे व्यसन असल्याचे सीमा यांना समजले. पतीकडून दारूच्या नशेत मारहाण होणे आणि शिवीगाळ हे सीमा यांना नित्याचेच झाले होते. आज ना उद्या पतीच्या स्वभावात बदल होईल या आशेवर पत्नीने १२ वर्षे तग धरला. मात्र पतीने ना मुलांची जबाबदारी घेतली ना पत्नीची. दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा, औषधपाण्याचा सर्वच खर्च सीमा यांना करावा लागत असे. त्यासाठी त्यांनी येथील काही सामाजिक संस्थांची देखील मदत घेतली आहे.
पतीच्या वागण्यात सुधार होत नसल्याने अखेर सीमा यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत फौजदारी अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने पत्नीला दरमहा सहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला.