पुण्यात दारुच्या नशेत हॉटेल व्यावसायिकाचा घरातच गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 03:11 PM2022-10-21T15:11:02+5:302022-10-21T15:12:29+5:30
ही घटना कळस-विश्रांतवाडी परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सव्वापाच वाजता घडली...
पुणे : दारुच्या नशेत एका हॉटेल व्यावसायिकाने घरातच पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नाही. ही घटना कळस-विश्रांतवाडी परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सव्वापाच वाजता घडली. सुरेश शंकरराव धापटे (वय ५०, रा. कळस) असे त्याचे नाव आहे.
याप्रकरणी धापटे याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. धापटे यांना ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांनी २०१५ मध्ये देखील अशाप्रकारे गोळीबार केला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, धापटे यांचा हॉटेलचा (रेस्टॉरंट ॲण्ड बार) व्यवसाय आहे. सकाळपासून त्यांचे घरात भांडण सुरू होते. त्यांनी दारु प्यायली होती. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास धापटे यांनी पिस्तुलातून एक गोळी आतून दरवाजावर झाडली. याबाबतची माहिती त्यांच्या वडिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन धापटे यांना ताब्यात घेतले. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.