‘ड्राय डे’लाही होते दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:34 AM2018-10-29T03:34:38+5:302018-10-29T03:35:57+5:30

पोलीस व उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष; अनधिकृत बीअरबार व लॉजचे पेव

'Dry Day' also sells liquor | ‘ड्राय डे’लाही होते दारूविक्री

‘ड्राय डे’लाही होते दारूविक्री

Next

विश्रांतवाडी : लोहगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. या परिसरात गावठी दारूच्या विक्रीसह ढाबे व हॉटेलमध्ये सर्रासपणे देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. शासनाचा कुठलाही परवाना नसताना एक प्रकारे या परिसरात अनके स्वयंघोषित ‘बीअरबार’ बिनदिक्कत सुरू असल्याचे दिसते.

लोहगाव - वाघोली रस्ता, लोहगाव - निरगुडी रस्ता, लोहगाव-अजिंक्य डी. वाय. पाटील कॉलेज रस्ता व इतर ठिकाणी असलेल्या १५-२० हॉटेल व ढाब्यांवर सर्रास बीअरबारच्या धर्तीवर दारूविक्री केली जाते. या अनधिकृत हॉटेलांमध्ये मद्यपी ग्राहकांना दारू पिण्याच्या टेबलापासून सर्व सुविधा खुलेआम पुरविल्या जातात. हे अनधिकृत बीअरबार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहेत. पोलीस व हॉटेलचालकांमध्ये असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे केवळ नावापुरती जुजबी कारवाई वगळता, काहीच ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे लोहगावमध्ये दिवसेंदिवस अनधिकृत बीअरबारच्या संख्येत वाढच होताना दिसते. विशेष म्हणजे ‘ड्राय डे’लाही कसलेही निर्बंध न पाळता या ठिकाणी दारूविक्री केली जाते.

या अनधिकृत बीअरबारमुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी बुडत आहे. त्याचबरोबर या परिसरात भांडणे, हाणामारी व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मागील काळात या भागात २ खून व इतरही गंभीर गुन्हे घडले आहेत. तरीही पोलीस व उत्पादन शुल्क विभाग सोयीस्करपणे बेकायदेशीर धंद्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या भागातील वाढत्या गुन्हेगारीला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.

अनधिकृत लॉजमध्येही बेकायदेशीर प्रकार
लोहगाव परिसरात राज्य शासन, पोलीस, महापालिका, बांधकाम विभाग अथवा इतर कुठल्याही शासन यंत्रणेची परवानगी न घेता अनेक ‘लॉज’ सुरू आहेत. येथील लॉजमध्ये मागील काळात अनेक गुन्हे व बेकायदेशीर घटना घडल्याचे समोर आले आहे. काही लॉजमध्ये वेश्याव्यवसायही चालविला जातो. महिला अथवा अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनाही घडल्या आहेत. तरीही हे अनधिकृत लॉज बिनदिक्कत सुरू असून त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांच्या कृपेशिवाय हे लॉज सुरू राहणे शक्यच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: 'Dry Day' also sells liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे