कोरडा पडलेला खाटपेवाडी तलाव बनलाय पाणीदार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:53+5:302021-07-12T04:08:53+5:30
पुणे : दोन वर्षांपूर्वी खाटपेवाडी तलाव कोरडा पडलेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्यात गाळ साठला होता. तो गाळ काढून ...
पुणे : दोन वर्षांपूर्वी खाटपेवाडी तलाव कोरडा पडलेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्यात गाळ साठला होता. तो गाळ काढून तिथली जागा मोकळी केली. त्यानंतर तिथे आज लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. आजूबाजूच्या विहिरींचा जलस्तरही वाढला आहे. त्यामुळे खाटपेवाडी तलावाने सर्वांच्या घरांमध्ये सुख-समृध्दीचा प्रवाह आणला आहे. तलावाच्या बाजूने झाडं लावल्याने पक्ष्यांची संख्याही वाढली आहे. यासाठी ग्रामस्थांनही सहभाग घेऊन हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
‘राम नदी पुनरुज्जीवन अभियान’अंतर्गत ‘किर्लोस्कर वसुंधरा’च्या वतीने खाटपेवाडी तलावाला नवसंजीवनी दिली आहे. दोन वर्षांमध्ये या तलावाचा कायापालट झाला असून, आज देखील तलावात ४० टक्के पाणीसाठा आहे. जोपूर्वी या वेळेला कोरडा पडलेला असायचा. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या १२ संस्था, ३३ महाविद्यालये, २५ शाळा, शंभर तज्ज्ञ, किर्लोस्कर कंपन्यांमधील कामगारांच्या सहयोगाने ही चळवळ सुरू केली आहे. रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी हे सर्व प्रयत्न करत आहेत. या नदीच्या उगमस्थानी खाटपेवाडी तलाव आहे. तलावाकाठी वृक्षारोपण केले होते. ती झाडे आता उंच झाली असून, त्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती अभियानाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.
खाटपेवाडी तलाव हा १९७२ साली दुष्काळ पडला तेव्हा तयार करण्यात आला होता. त्यानंतर एकदाही या तलावाचे खोलीकरण किंवा गाळ काढण्यात आला नव्हता. परिणामी त्यात खूप गाळ साठत गेला आणि पाणी साठा कमी होत गेला. ही स्थिती असताना ३०० ट्रक येथील गाळ काढून तो तलावाच्या बाजूने टाकण्यात आला. त्यावर वृक्षारोपण करण्यात आले असून, तिथे सोमवारी स्मृती मार्ग तयार करण्यात येत आहे, असे चित्राव यांनी सांगितले.
————————-
आज ‘स्मृती मार्गा’चे उद्घाटन
खाटपेवाडी तलावाच्या उजव्या कडेला वृक्षारोपण-संवर्धनाचा कार्यक्रम सोमवारी होत आहे. कोरोना महामारीमुळे भुकूम गावातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या नावाने ‘स्मृती मार्ग’ तयार होणार आहे. त्यासाठी सोमवारी तिथे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, भुकूम सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन आंग्रे उपस्थित राहतील.