मांजरी येथे लवकरच ‘कोवॅक्सिन’च्या मशिनरीची ड्राय-रन सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:12 AM2021-05-13T04:12:23+5:302021-05-13T04:12:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार भारत बायोटेकला पुण्यातील मांजरी येथील जमीन कोवॅक्सिन तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : न्यायालयाच्या आदेशानुसार भारत बायोटेकला पुण्यातील मांजरी येथील जमीन कोवॅक्सिन तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिली. कंपनी एकदोन दिवसांत गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या मशिनरीची ड्राय-रन घेणार आहे. कंपनीला आवश्यक असलेले रस्ते, लाईट आणि पाणी या मदतीसह अन्य सर्व सहकार्य जिल्हा प्रशासन तातडीने करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितली.
कोरोनाकाळात लसींचा आणि खासकरून ‘कोवॅक्सिन’चा तुटवडा असताना त्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात पुण्यानजीकची जागा भारत बायोटेकची सहयोगी कंपनी ‘बायोव्हॅट प्रायव्हेट लिमिटेड’ला मंजुरी द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्देशांमुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यास मदतच होणार आहे, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डाॅ. देशमुख यांनी मांजरी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याबाबत देशमुख यांनी सांगितले की, भारत बायोव्हॅट कंपनीचे हैदराबाद येथील काही वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. हा प्रकल्प तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि मशिनरी सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये मशिनरी अनेक दिवसांपासून बंद असल्याने त्याची तातडीने ड्राय-रन घेण्यात येईल. त्यानंतर आठ दहा दिवसांत प्रत्यक्षात कोवॅक्सिन बनवण्यासाठी आवश्यक असलेला टाईमलाईन कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याशिवाय इतर परवानग्या व लायन्ससाठी देखील काही मदत लागल्यास जिल्हा प्रशासन सर्व सहकार्य करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.