इंदापूर तालुक्यात रस्त्यांवर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:22+5:302021-05-12T04:12:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इंदापूर : तालुुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी इंदापूर तालुक्यात सात दिवसांचा कडक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : तालुुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी इंदापूर तालुक्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनला मंगळवारपासून सुरुवात झाली. याला तालुक्यातील छोटे-मोठे व्यावसायिक व नागरिकांनी प्रतिसाद दिला. कुणीही घराबाहेर न पडल्याने सर्व रस्ते ओसाड पडले होते.
इंदापूर शहरातील बसस्थानक, मुख्य बाजारपेठ, चाळीस फुटी रोड, दर्गाह मस्जिद चौक, नेहरू चौक, अकलूज नाका, टेंभुर्णीनाका, पुणेनाका, खुळे चौक, बाबा चौक, इंदापूर नगरपालिका गाळे येथे दररोज दिसणारी गर्दी लॉकडाऊनमुळे नव्हती. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट होता. इंदापूर पोलिसांनी देखील कडक अंमलबजावणी केली. चौका-चौकांत पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले होते. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दूध वितरण चालू होते. शासनाने होमडिलिव्हरी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते ग्रामीण भागात शक्य होत नसल्याने, दूधविक्रेते त्यांच्या नेहमीच्या जागेवरच दूध विक्री करत होते. पेट्रोलपंप दुपारी ३ वाजेपर्यंत चालू होते. इंदापूर तालुक्यातील भिगवण, बावडा, वालचंदनगर, निमगाव केतकी, सणसरच्या परिसरातील गावांमध्येही नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळला होता. तालुक्यातील ग्रामीण भागातही कडक लॉकडाऊन होता. सर्व प्रकारची दुकाने बंद होते. त्याचबरोबर ग्राहक नसल्याने ग्रामीण भागातील अनेक मेडिकलधारक यांनी आपली दुकाने बंद ठेवलेली होती. मात्र, शेतकरी शेतामध्ये काम करताना दिसत होते. उन्हाळा असल्याने लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरी बसून उन्हापासून दिलासा मिळाला असल्याचे चित्र दिसून येत होते.
फोटो ओळ : लॉकडाऊनमुळे इंदापूर शहरातील बाजार पेठेत पसरलेला शुकशुकाट