बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी दाम्पत्याची पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:35 AM2018-02-07T11:35:52+5:302018-02-07T11:36:15+5:30
बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी दांपत्य पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी दांपत्य पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील ५ दिवस चौकशी होणार आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत तर त्यानंतर ३ ते ५ अशा वेळेत ही चौकशी होणार आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची आजपासून पुढील ५ दिवस चौकशी होणार आहे. तर १३ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात कुलकर्णी दाम्पत्यास हजर व्हावे लागणार आहे. कुलकर्णी यांनी तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी ३ वेळा मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र कुलकर्णी यांच्याकडून अद्याप ही रक्कम भरण्यात आलेली नाही. उसणे आणा, भीक मागा मात्र रक्कम जमा करा, असेही न्यायालयाने फटकारले होते. त्या पार्श्वभूमीवर आजपासून पुढील ५ दिवस त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे. आमचे पैसे लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे.