डी.एस. कुलकर्णींची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 07:36 PM2018-02-17T19:36:34+5:302018-02-17T19:46:37+5:30
दोघांनाही विमानाने सायंकाळी पुण्यात आणण्यात आले.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांना शनिवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आज सकाळीच पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज संध्याकाळी या दोघांनाही पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने या दोघांनाही 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
उच्च न्यायालयाने शुक्रवारी कुलकर्णी दाम्पत्याचा जामीन काढून घेतला होता. त्यामुळे आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होईल, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी पुण्यातून आधीच पसार झाले. मात्र, या खटल्याचा एकंदरच घटनाक्रम पाहता पोलीस आधीपासूनच सतर्क होते. त्यामुळे पोलिसांनी अगोदरपासूनच मुंबई, दिल्ली आणि पुण्यात चार पथके डी.एस. कुलकर्णी यांच्या मागावर लावली होती. अखेर दिल्लीतील वसंत कुंज परिसरातील डी. एम. सी. क्लबमध्ये ते असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून कुलकर्णी दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर दोघांनाही विमानाने सायंकाळी पुण्यात आणण्यात आले. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. ती. उत्पात यांच्यासमोर दोघांनाही हजर करण्यात आले.
यावेळी सरकारी वकिलांनी सांगितले की, डी. एस. के. यांनी अत्यंत योजनबद्ध रीतीने लोकांकडून पैसा गोळा केला आणि तो वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत तो पैसा फिरवला. या पैशाची त्यांनी कशाप्रकारे विल्हेवाट लावली, याची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तीवाद ग्राह्य धरत कुलकर्णी दाम्पत्याला 23 फेब्रुवारीपर्यंत पोली कोठडी सुनावली.