डीएसके प्रकरण : २ हजार ४३ कोटींची फसवणूक; ३२ हजार गुंतवणुकदार आजही वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 06:21 AM2020-10-28T06:21:00+5:302020-10-28T10:37:53+5:30

जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना केले आकर्षित...

DSK case: Fraud of Rs 2,043 crore; 32,000 investors still on the air today | डीएसके प्रकरण : २ हजार ४३ कोटींची फसवणूक; ३२ हजार गुंतवणुकदार आजही वाऱ्यावर

डीएसके प्रकरण : २ हजार ४३ कोटींची फसवणूक; ३२ हजार गुंतवणुकदार आजही वाऱ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे९१ मालमत्ता लिलावासाठी न्यायालयात अर्ज : ३२ हजार गुंतवणुकदार

विवेक भुसे - 

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यानी जादा परताव्याचे आमिष दाखवून राज्यभरातील गुंतवणुकदारांना आकर्षित करुन त्यांची तब्बल २ हजार ४३ कोटींची फसवणुक केली असून असे ३२ हजार गुंतवणुकदार गेल्या तीन वर्षांपासून अक्षरश: वाऱ्यावर असून आपली गुंतवणुक कधी परत मिळेल, याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्यावर २८ आॅक्टोबर २०१८ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एम.पीआय.डी. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याला बुधवारी ३ वर्षे पूर्ण होत आहे. डीएसके यांनी मुदत ठेवीमध्ये गुंतवणुक करण्यास आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या. तब्बल ३२ हजारांहून अधिक लोकांनी सुमारे २ हजार ४ कोटी रुपयांच्या ठेवी डीएसके यांच्याकडे ठेवण्यात आल्या आहेत.

लोकांना व्याजाची रक्कमही मिळेनाशी झाली. तेव्हा लोकांनी तक्रार करायला सुरुवात केली. शेवटी डीएसके पैसे परत देत नसल्याचे पाहून जितेंद्र मुळेकर यांची २८ आॅक्टोबर २०१८ रोजी पोलिसांनी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर डी एस कुलकर्णी यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांना प्रथम ५० कोटी रुपये अनामत रक्कम भरायला सांगितले. ती ते भरु न शकल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर पुणे पोलिसांनी डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना १८ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीहून अटक करण्यात आली.

पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, सांगली येथे डी एस कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.तेथील पोलीसही या प्रकरणात तपास करीत आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांना अटक केली असून त्यापैकी ११ जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत.डी एस के यांच्या २० गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्यापैकी ६ गाड्यांचा लिलाव करण्यात आला. त्यातून ३९ लाख रुपये जमा झाले आहेत़ त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकेत असलेले १२ कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत.  
डीएसके यांच्या ४५९ मालमत्ता चौकशीत समोर आल्या असून त्यापैकी ९१ मालमत्तांवर कोणताही बोजा अथवा कर्ज नाही.या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज पोलिसांनी सोमवारी न्यायालयात केला आहे.


फॉरेन्सिक रिपोर्ट अंतिम टप्प्यात

डी.एस.कुलकर्णी यांनी लोकांकडून स्वीकारलेल्या ठेवी नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरल्या. त्या कशा कोणत्या खात्यामार्फत कोठे हस्तांतरीत करण्यात आला. त्या नेमक्या गेल्या कोठे यासंबंधितचा फॉरेन्सिक रिपोर्ट तयार करण्यात येत असून तो त्यातून हा पैसे नेमका कोठे गेला, हे समजणार आहे.हा रिपोर्ट अंतिम टप्प्यात असून येत्या महिन्याभरात तो न्यायालयात सादर केला जाण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, डी.एस. कुलकर्णी यांच्या विविध प्रकल्पात फ्लॅट नोंदणी करणाऱ्यांचे हाल झाले आहेत. कुलकर्णी यांनी आधी ताबा नंतर ईएमआय अशी योजना जाहीर केली होती. प्रत्यक्षात त्यांनी या फ्लॅटधारकांच्या नावावरील संपूर्ण कर्ज उचलले. मात्र, इमारतीचे काम अपूर्ण ठेवले आहे.त्यामुळे आता खासगी फायनान्स कंपन्यांनी फ्लॅटधारकांच्या पगारातून ईएमआय कापून घेण्यास सुरुवात केली आहे़ त्याविरोधात फ्लॅटधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.सुमारे ११०० फ्लॅटधारकांची यात फसवणुक झाली आहे.
डी एस केच्या खटल्यात आता नियमितपणे सुनावणी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कर्ज अथवा कोणताही बोजा नसलेल्या मालमत्तांचा लिलावास न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर येत्या काही महिन्यात ही प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर जमा झालेले पैसे कसे परत करायचे यासंबंधी जिल्हा प्रशासन, पोलिसांकडून त्याची यादी मागविल्यानंतर न्यायालयातून ते पैसे प्रत्यक्ष गुंतवणुकदारांना देण्याचा आदेश होऊ शकेल. या सर्व प्रक्रियेला अजून किती काळ लागेल, हे अद्याप कोणीही सांगू शकत नाही.

..........

आम्ही कसे जगायचे? 
डी एस कुलकर्णी यांचे नाव ऐकून आम्ही आमची ठेव त्यांच्याकडे गुंतविली होती.गेल्या तीन वर्षांपासून त्यावरील व्याजही मिळाले नाही. माझ्यासारख्या असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी डी एसके यांच्याकडे त्यांच्या आयुष्याची पुंजी गुंतविली होती.आमच्या वृद्धापकाळातच जर ती मिळत नसेल तर आम्ही जगायचे कसे. आमच्या ठेवी आम्हाला लवकरात लवकर व्याजासह मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे.
तुळशीराम राऊत, गुंतवणुकदार.

........

४० गुंतवणुकदाराचे निधन
डी एसकेच्या कंपनीत गुंतवणुक केलेल्यापैकी किमान ३५ ते ४० गुंतवणुकदारांचे गेल्या ३ वर्षात निधन झाले आहे.कोरोना लागण होऊनही अनेक जणांचा मृत्यु झाला आहे. यात ज्येष्ठ नागरिक अधिक असून आता त्यांना मुलांकडून दोष दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
दीपक फडणीस, गुंतवणुकदार

Web Title: DSK case: Fraud of Rs 2,043 crore; 32,000 investors still on the air today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.