डीएसके दाम्पत्याची ५ तास चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:02 AM2018-02-08T01:02:49+5:302018-02-08T01:03:04+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती हे बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची पोलीस अधिका-यांनी ५ तास चौकशी केली.
पुणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती हे बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले़ त्यांची पोलीस अधिका-यांनी ५ तास चौकशी केली़
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, तपास अधिकारी व सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी त्यांची सकाळी २ तास तर दुपारनंतर सलग ३ तास चौकशी केली़ त्यांनी ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवींची कोठे कोठे गुंतवणूक केली़ त्यांच्या मालमत्ता आणखी कोठे आहेत, याविषयी चौकशी केली़ ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या पुणे, मुंबई येथील कार्यालयासह घरावर छापे टाकून सर्व कागदपत्रे जप्त केली होती़ बँकांची खातीही सील करण्यात आली़ त्यातून जी माहिती पोलिसांना उपलब्ध झाली़ त्याबाबत प्रश्न विचारण्यात आले़ चौकशीनंतर बाहेर आल्यावर डी़ एस़ कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला़ पोलिसांनी परवानगी दिली तरच आपण बोलू, असे त्यांनी सांगितले़ चौकशीबाबत मोरे यांनी सांगितले, की या चौकशीचा अहवाल आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. तपास सुरू असल्याने नेमके काय विचारण्यात आले, हे सांगता येणार नाही़ डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत ४ हजार २० ठेवीदारांनी तक्रारी केल्या आहेत. ठेवींची रक्कम २८० कोटी ५८ लाख ५६ हजार ५८८ रुपये इतकी आहे़ त्यांच्या मालमत्तांची यादी एका महिन्यापूर्वीच जिल्हाधिकाºयांना दिली असून त्यावर महसूल विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे, असे त्यांनी सांगितले़
उच्च न्यायालयात ५० कोटी रुपये जमा करण्यात डी. एस. कुलकर्णी यांना अपयश आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही पोलीस चौकशी सुरू झाली आहे़
ही चौकशी दररोज सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ या दरम्यान आणखी ४ दिवस सुरु राहणार आहे़ प्रामुख्याने त्यांनी ठेवीदारांचा आलेला पैसा हा अन्यत्र कोठे गुंतविला़ बँकांकडून घेण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेचा विनियोग कोठे केला, याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत़
डीएसके यांच्या आर्थिक व्यवहाराचे फॉरेन्सिक आॅडिट करण्यासाठी पोलिसांनी लेखा परिक्षकाची नेमणूक केली असून त्यांचा अहवाल महिन्याभरात येण्याची शक्यता आहे़ त्यातून डीएसके यांनी हा सर्व पैसा नेमका कोठे वळविला, ते उघड होण्याची शक्यता आहे़
डी़ एस़ कुलकर्णी यांच्या घोटाळ्याची सेबीने दखल घेतली असून त्यांच्याकडूनही चौकशी सुरू करण्यात आली आहे़ त्यासाठी गंभीर फसवणुकीच्या तपासासाठी अधिकाºयाची (एसएफआयओ) नेमणूक करण्यात आली़