‘डीएसकें’ना १५ दिवसांची मुदत, ५० कोटी रुपये भरण्यासाठी मिळाला अवधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:47 AM2017-12-05T04:47:01+5:302017-12-05T04:47:13+5:30
पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तुर्तास दिलासा दिला आहे. येत्या १५ दिवसांत ५० कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याची मुदत उच्च न्यायालयाने त्यांना दिली आहे
मुंबई : पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तुर्तास दिलासा दिला आहे. येत्या १५ दिवसांत ५० कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याची मुदत उच्च न्यायालयाने त्यांना दिली आहे. परंतु, दिलेल्या अवधीत रक्कम जमा करण्यास यश आले नाही, तर अटकपूर्व जामिनासाठी येऊ नका, असे उच्च न्यायालयाने डीएसकेंना बजावले आहे.
१९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याची तयारी डीएसकेंनी न्यायालयात दर्शवली होती. मात्र या कालावधीवर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला होता. डीएसके जास्त दिवस मुदत मागत आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात म्हटले. त्याचवेळी डीएसकेंचे वकील अशोक मुंदर्गी यांनी एवढ्या दिवसांत ५० कोटी रुपये जमा करण्याची हमी न्यायालयाला दिली.
त्यामुळे न्या. अजय गडकरी यांनी डीएसकेंना अटकेपासून तुर्तास दिलासा दिला. तसेच दिलेल्या अवधीत पैसे जमा करा असे सांगतानाच, पैसे भरले नाहीत, तर अटकपूर्व जामिनासाठी येऊ नका, असेही न्यायालयाने डीएसकेंना बजावले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने डीएसकेंना ५० कोटी रुपये केव्हा भरणार, यासबंधी हमीपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी डीएसकेंनी न्यायालयात हमीपत्र सादर करत ५० कोटी रुपये जमा करण्यासाठी १५ दिवसांची मुदत मागितली आहे.