'डीएसके' जामिनावर सुटले; गुंतवणूकदारांना न्याय मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:50 AM2023-04-19T10:50:41+5:302023-04-19T10:51:01+5:30
डीएसके यांच्या मालमत्ता शासनाने जप्त केल्या; मात्र, त्या सुरक्षित राहतील, अशी कोणतीही पुरेशी व्यवस्था केलेली नाही
पुणे : डीएसके प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या तब्बल ३३५ मालमत्ता जप्त केल्या गेल्या. या मालमत्ता विक्री करून त्याचे पैसे गुंतवणूकदारांना देणे अपेक्षित होते; मात्र गेल्या पाच वर्षांत मावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडले आहे. चार वर्षे कारागृहात राहिलेले डीएसके जामिनावर सुटले; गुंतवणूकदार मात्र न्यायापासून वंचितच राहिले आहेत. सरकारच्या उदासीनतेमुळे हा प्रकार घडला असून, गुंतवणूकदारांना न्याय केव्हा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याने २०१८ व २०१९ मध्ये डीएसके यांच्या तब्बल ३३५ मालमत्ता जप्त केल्या हाेत्या. वेळोवेळी झालेल्या सुनावणीनंतर ५२ मालमत्तांमध्ये कोणतेही वाद नसल्याचे आढळले. याबाबत २०१९ मध्ये न्यायालयाने याची यादी तयार करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले हाेते. ही यादी तयार केल्यानंतर त्याची विक्री करावी असे रोजनाम्यात नमूदही केले. मात्र, केवळ वाहने विक्रीचे आदेश न्यायालयाने दिल्याने ती विकण्यात आली. मालमत्तांबाबत स्पष्ट आदेश नसल्यानेच मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी आजवर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांचे पैसे केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, या ५२ मालमत्तांची यादी शिर्के यांच्या कार्यालयाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत गुंतवणूकदारांची बाजू लढणारे संजय आश्रित यांनी ही यादी नुकतीच शिर्के यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केली. स्पष्ट आदेश नसल्याने त्याच्या विक्रीची कार्यवाही करता येत नसल्याचे शिर्के यांनी आश्रित यांना सांगितले. मात्र, तत्कालीन राजे यांच्या न्यायालयाचे मालमत्ता विक्रीबाबतचे म्हणणे रोजनिशीत नमूद असल्याचे आश्रित यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आश्रित म्हणाले, “शिर्के यांना ही ५२ मालमत्तांची यादी दिल्यानंतर आता रोजनिशीतील इतिवृत्त देण्यात येईल. ते मिळाल्यानंतर शिर्के हे स्वत: न्यायालयाकडून विक्रीचे आदेश घेणार आहेत. त्यानंतर या मालमत्तांच्या विक्रीचा मार्ग मोकळा होईल. या व्यतिरिक्त डीएसके यांच्या २० मालमत्ता जप्त केलेल्या नाहीत. त्याची यादीही आर्थिक गुन्हे शाखा व शिर्के यांना दिली आहे. ईओडब्ल्यूने या मालमत्तांबाबत तलाठी व दुय्यम निबंधकांकडे तीन महिन्यांपूर्वीच माहिती मागितली आहे. आता शिर्के यांनीही ही यादी मागवली असून तलाठ्यांकडून माहिती घेणार असल्याचे सांगितले आहे.”
..तर मालमत्ता विकल्या जातील
डीएसके आता जामिनावर बाहेर आल्याने ज्या मालमत्ता जप्त केलेल्या नाहीत, त्यांची आता विक्री होऊ शकते, अशी भीतीही आश्रित यांनी व्यक्त केली. त्यांची पत्नी हेमंती जामिनावर सुटल्यावर अशा दोन मालमत्तांची विक्री झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जप्त न केलेल्या मालमत्ता तातडीने जप्त कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या जागांवर मालकी हक्क डीएसकेंचा आहे, त्या मालमत्ता आमच्या पैशांतून घेतल्या असल्यास त्या विकून आमचे पैसे आम्हाला द्या, अशी मागणी त्यांनी केली.
प्रांताधिकाऱ्यांना जबाबदार का धरू नये?
तळेगाव येथील डीएसके सदाफुली ही मालमत्ता जप्त न केल्याने महारेराच्या एका आदेशावरून एका बांधकाम व्यावसायिकाला त्याची विक्री करण्यात आली. त्यात ४२ कोटींचा व्यवहार झाला. हे पैसे गुंतवणूकदारांचे असल्याने ते त्यांना मिळायला हवे हाेते, असेही ते म्हणाले. मावळचे प्रांताधिकारी म्हणून संदेश शिर्के यांची ती मालमत्ता जप्त करण्याची जबाबदारी होती. मात्र, त्यांनी ती पाळली नाही, असा आरोपही आश्रित यांनी केला. तळेगाव त्यांच्याच कार्यक्षेत्रात असूनही त्याची विक्री होते याचा अर्थ दिव्याखाली अंधार आहे, असे ते म्हणाले. विक्रीतून आलेले पैसे बुडाल्याने प्रांताधिकाऱ्यांना जबाबदार का धरू नये, असा सवाल त्यांनी केला.
गुंतवणूकदार ठरले कर्जबुडवे
पैसे बुडाल्यावरून आजवर १०० ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे. अनेक गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांनी काढलेल्या कर्जाचे हप्ते जानेवारी २०२३ पर्यंत सुरू होते. विभागीय आयुक्तांनी केलेल्या मध्यस्थीनंतर या बँकांनी हप्ते घेणे बंद केले. मात्र, ही कर्जे निर्लेखित करण्यात आली असून ती माफ केलेली नाहीत. त्यामुळे गुंतवणूकदार कर्जबुडवे ठरले आहेत. त्यामुळे नवीन कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
किमान ८० टक्के पैसे मिळू शकतात परत...
जामीन मिळाल्यानंतर डीएसके यांना पोलिसांकडे वेळोवेळी हजेरी लावावी लागत आहे. हे कर्ज लोकांची जबाबदारी नसून माझी जबाबदारी. त्यांनी माझ्या मालमत्तेवर हक्क सांगावा त्या विकून पैसे घ्यावे, असे डीएसकेंनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे, असे आश्रित यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मालमत्ता विक्रीतून सर्व गुंतवणूकदारांचे किमान ८० टक्के पैसे परत मिळू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
जप्त मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर चोरी
डीएसके यांच्या मालमत्ता शासनाने जप्त केल्या; मात्र, त्या सुरक्षित राहतील, अशी कोणतीही पुरेशी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे हडपसर, फुरसुंगी येथील त्यांच्या संस्थांमधील वेगवेगळ्या वस्तू लोकांनी चोरून नेल्या आहेत. त्यांचे कार्यालय, शोरूम तसेच निवासस्थान जप्त केले असून, या वास्तू धूळ खात पडल्या आहेत. त्यांचे मूल्यांकन आता खूप घसरले असल्याची शक्यता आहे.