डीएसकेंची अटकपूर्व जामीनासाठी धाव; ४ नोव्हेंबरला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:30 PM2017-11-03T19:30:02+5:302017-11-03T19:34:13+5:30
डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे.
पुणे : गुंतवणुकदारांच्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शनिवारी (दि. ४) सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार आहे.
गुंतवणुकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर फसवणूकीबरोबरच महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या शिवाय संस्थेने विश्वासघात केल्याचा आणि गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याची कलमे देखील लावण्यात आली आहेत. जितेंद्र नारायण मुळेकर यांनी फिर्याद दिली आहे. या शिवाय पाचशेहून अधिक तक्रारदारांनी अर्ज केला आहे.
कुलकर्णी यांनी १९८० ते २०१६ या कालावधीत गुंतवणूकदारांना दहा हजार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. अनेक गुंतवणुकदारांनी डीएसके देशाबाहेर पलायन करणार अशी अफवा पसरविली आहे. मात्र, त्यांनी त्यांचा पासपोर्ट पोलिसांकडे स्वत:हून जमा केला आहे. तपासात पोलिसांना ते संपूर्ण सहकार्य करीत आहेत. ड्रीम सिटी प्रकल्पातील त्यांचे भागिदार सोडून गेल्याने कंपनी सध्या काहीशी अडचणीत आली आहे. मात्र, त्यांच्या कंपनीकडे पुरेशी मालमत्ता आहे. गुंतवणूकदारांबरोबर देखील त्यांनी अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यांचा हेतू हा गुंतवणुकदारांचे पैसे बुडविण्याचा नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामिन मिळावा, असे अर्जात म्हटले आहे. डीएसके यांच्यावतीने अॅड. श्रीकांत शिवदे आणि गिरीष कुलकर्णी यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.