डीएसकेंची 'ऑडी' जप्त, पोलीस कोठडी आज संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 07:22 AM2018-03-01T07:22:33+5:302018-03-01T07:22:33+5:30
आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या़
पुणे : आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ताफ्यातील ५० लाख रुपयांची आॅडी ही कार जप्त केली. यापूर्वी त्यांच्या ६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या़
डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे बुधवारीही पोलिसांची चौकशी सुरू होती़ आता आपली यातून सुटका नसल्याची जाणीव झाल्याने त्यांच्याकडून पोलिसांना सहकार्य मिळू लागले आहे़ पोलीस डीएसके यांना बुधवारी त्यांच्या कार्यालयात घेऊन जाऊन दिवसभर कागदपत्रांची तपासणी करीत होते़ तपासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत़
डीएसके व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना न्यायालयाने गेल्या शुक्रवारी १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती़ यापूर्वी उच्च न्यायालयाने पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते़ त्या वेळी त्यांच्याकडून तपासासाठी पोलिसांना सहकार्य मिळाले नव्हते़ गेल्या सात दिवसांत पोलिसांना त्यांनी तपासात सहकार्य करण्यास सुरुवात केली असली, तरी अजूनही ठेवीदार व फ्लॅटधारकांचा पैसा कोठे वळविला, याची पुरेशी माहिती त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेली नाही़ आता मात्र ते सहकार्य करू लागले आहेत़ डीएसके यांच्याविरुद्ध कोल्हापूर आणि मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत़
पोलीस कोठडी संपणार
सात दिवसांत डीएसके यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना दररोज वैद्यकीय तपासणीसाठी नेणे, आणणे यात तपासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही़ या गुन्ह्याचा आवाका मोठा असल्याने ही पोलीस कोठडी पुरेशी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे़ त्यामुळे गुरुवारी न्यायालयात पोलिसांकडून पोलीस कोठडी वाढून मिळावी, यासाठी विनंती केली जाण्याची शक्यता आहे़