भीक नको पण उभारी देण्यासाठी मदत करा, डीएसकेंचं भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 08:14 PM2018-02-08T20:14:03+5:302018-02-08T20:17:22+5:30
माझ्यासाठी दिला जाणारा हा खारीचा वाटा नसून सिंहाचा वाटा असेल, डीएसके हा माणूस फसवणार नाही हे लोकांना माहीत आहे.
पुणे : मला भीक नको पण पुन्हा उभारी देण्यासाठी मदत करा असं भावनिक आवाहन अडचणीत सापडलेले सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं. उच्च न्यायालयात 50 कोटी रुपये जमा करण्यात डी. एस. कुलकर्णी यांना अपयश आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार काल पोलिसांनी डीएसके दांपत्याची 5 तास चौकशी केली. ही चौकशी दररोज सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5 या दरम्यान आणखी 4 दिवस सुरु राहणार आहे़.
दरम्यान, आज पत्रकार परिषदेत डीएसकेंनी अमेरिकेच्याधर्तीवर क्राऊड फंडिंगमधून निधी जमा करुन लोकांचे पैसे परत करणार असल्याची माहीती दिली. त्यासाठी क्राउड फंडिंग सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले. आपल्यासाठी दिला जाणारा हा खारीचा वाटा नसून सिंहाचा वाटा असेल असंही डीएसके यावेळी म्हणाले. लहानपणीच्या आठवणी सांगताना डीएसके हा माणूस फसवणार नाही हे लोकांना माहीत असून लोक आपण होऊन मदतीचा हात पुढे करीत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे मी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म अशा लोकांना उभा करून देत आहे. या द्वारे निर्माण होणाऱ्या फंडातून मी पुन्हा उभारी घेईन असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात याच फंडातून माझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देईन असे ते म्हणाले.
रिकाम्या हातानं येऊ नका, पैसे उसने घ्या, भीक मागा, काहीही करा, लोकांचे पैसे कधी परत करणार याची माहिती द्या, असे मुंबई हायकोर्टाने डी. एस. कुलकर्णी यांना बजावलं आहे. तसेच, 13 फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीत डीएसकेंना पत्नी हेमांगीसह हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 4 हजार 20 ठेवीदारांनी तक्रारी केल्या आहेत. ठेवींची रक्कम 280 कोटी 58 लाख 56 हजार 588 रुपये इतकी आहे.