दिवेघाटात १६ ठिकाणी धोकादायक दरडी
By Admin | Published: June 10, 2017 01:50 AM2017-06-10T01:50:32+5:302017-06-10T01:50:32+5:30
संत ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी २० जून रोजी सासवड मुक्कामी येत आहे. त्यानंतर या पालखीचा पुरंदर तालुक्यातील प्रवास नीरा शहरापर्यंत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गराडे : संत ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी २० जून रोजी सासवड मुक्कामी येत आहे. त्यानंतर या पालखीचा पुरंदर तालुक्यातील प्रवास नीरा शहरापर्यंत आहे. या काळात पालखीसोबत लाखो वारकरी पायी प्रवास करीत असतात. त्यांना प्रवासात रस्त्यावर कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी सर्वांनी घ्यावयाची आहे. दिवे घाटात १६ ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती मला मिळाली. पाहणीत दरडी ढासळल्याची गंभीरता लक्षात आली. दिवेघाटात दरडीबरोबर घाटातील बाजूची गटारे अनेक ठिकाणी बंद आहेत. राडारोडा रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता आहे. दिवेघाटातील दरडी तातडीने दूर करण्यासाठी व इतर दुरुस्तीसंदर्भात आपण जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. झेडेंवाडी येथील दिवेघाटात दरडी कोसळल्या असून त्या तातडीने काढाव्यात, यासाठी जेजुरी येथील बैठक आटोपून सुप्रिया सुळे यांनी स्वत: दिवेघाटातील दरडींची पाहणी केली. या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण, नीरा मार्केट कमिटीचे उपसभापती ईश्वर बागमार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी पुस्तक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. जितेंद्र देवकर, दिवे गावचे उपसरपंच अमित झेंडे, प्रवीण शिंदे, शाम टिळेकर उपस्थित होते.