दरमहा तयार होणाऱ्या ६ कोटी डोसांमुळे ‘सीरम’कडे जगाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:25+5:302020-11-26T04:26:25+5:30

\Sलोकमत न्युज नेटवर्क पुणे : जगात लसीच्या उत्पादनात अग्रेसर असलेली पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था भारतासाठी तारणहार ...

Due to the 6 crore doses produced every month, the world's attention is focused on 'serum' | दरमहा तयार होणाऱ्या ६ कोटी डोसांमुळे ‘सीरम’कडे जगाचे लक्ष

दरमहा तयार होणाऱ्या ६ कोटी डोसांमुळे ‘सीरम’कडे जगाचे लक्ष

Next

\Sलोकमत न्युज नेटवर्क

पुणे : जगात लसीच्या उत्पादनात अग्रेसर असलेली पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था भारतासाठी तारणहार ठरू शकते. ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड लसीचे ८ ते १० कोटी डोस येत्या जानेवारीअखेरपर्यंत ‘सिरम’कडून तयार केले जाऊ शकतात. त्यानंतर दरमहा ५ ते ६ कोटी डोस तयार करण्याची संस्थेची क्षमता आहे. सध्या भारतात याच लसीची चाचणी अंतिम टप्प्यात असल्याने केंद्र सरकारचे लक्षही त्याकडे लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महत्वपूर्ण मानली जाते.

भारतासह अनेक देशांमध्ये ३०० हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यापैकी जवळपास ५० ते ६० लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. त्यातही १० ते १२ लसीच आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यात पोहचल्या आहेत. तर कोविशिल्डसह अमेरिकेतील मॉडर्ना, फायझर आणि रशियातील स्पुटनिक या लसींच्या चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. यात चीननेही आघाडी घेतलेली आहे.

अमेरिका व रशियाने नागरिकांना लस देण्याची तयारीही सुरू केली आहे. अनेक विकसित देशांनी आधीपासूनच लसींच्या खरेदीसाठी पूर्वनोंदणी केली आहे. या देशांमध्ये सर्वप्रथम लस मिळविण्यासाठी चढाओढ लागली आहे. मात्र, बहुतेक कंपन्यांकडून आपल्या देशालाच पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते.

भारताच्या दृष्टीने सिरममधील कोविशिल्डि व भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून संयुक्तपणे विकसित करण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही लस महत्वाची ठरणार आहे. कोविशिल्डच्या परदेशातील चाचण्यांमध्ये ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे भारतातील चाचण्यांबाबत आशा निर्माण झाली आहे. सिरमकडून नाकातून देण्यात येणाऱ्या लसीच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

चौकट

भारतीय बनावटीची एकमेव लस असलेल्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पण अद्याप त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले नाहीत. भारतात अन्य तीन कंपन्यांकडूनही लसीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

चौकट

‘सिरम’ भारतासाठी महत्त्वाची

केंद्र सरकारकडून जुलैअखेरपर्यंत २५ ते ३० कोटी डोसचे नियोजन केले जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. ‘सिरम’ ही जगातील सर्वात जास्त लसींचे उत्पादन करणारी संस्था आहे. त्यामुळे भारताची गरज सिरमकडूनच मोठ्या प्रमाणावर भागविली जाऊ शकते. ‘सिरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलताना संस्थेकडून जानेवारीपर्यंत लसीचे ८ ते १० कोटी डोस तयार असतील, असे सांगितले होते. तसेच त्यानंतर प्रत्येक महिन्याला ५ ते ६ कोटी डोस तयार करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संस्थेची ही क्षमता विचारात घेऊनच केंद्र सरकार ‘सिरम’कडून अधिकाधिक डोस मिळविण्याचा प्रयत्न करू शकते.

Web Title: Due to the 6 crore doses produced every month, the world's attention is focused on 'serum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.