मोटारीने पेट घेतल्याने महिलेचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:16 AM2018-09-11T01:16:20+5:302018-09-11T01:16:23+5:30
चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने संगीता मनीष हिवाळे (वय ४४) या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी हिंजवडी परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड जकात नाक्याजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.
हिंजवडी : चालत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याने संगीता मनीष हिवाळे (वय ४४) या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी हिंजवडी परिसरात मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड जकात नाक्याजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. मोटारीतील तिघांना सुखरूप बाहेर पडण्यात यश आले. ते किरकोळ जखमी झाले आहेत.
हिंजवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता यांना रात्री रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. त्यांना जॉन डॅनियल बोर्डे हे मोटारीत घेऊन रुग्णालयाकडे निघाले. मोटारीत संगीता यांच्यासह सायमन मनीष हिवाळे (वय १५), तसेच माया डॅनियल बोर्डे (वय ६५), जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०) हे तिघेही होते. वाकड जकात नाक्याजवळ गेले असता, मोटारीच्या मागील बाजूने अचानक धूर येत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी मोटार सर्व्हिस रस्त्याला नेली. परंतु मोटारीने अधिक पेट घेतला होता. पेटत्या मोटारीतून तिघे जण बाहेर पडले. त्यांना किरकोळ जखम झाली.
प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्याने संगीता यांना तातडीने बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे मोटारीतच त्यांचा आगीत होरपळून मृत्यू
झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.