जागा निश्चित न झाल्यामुळे माळीणचे पुनर्वसन रखडले
By admin | Published: July 26, 2015 12:41 AM2015-07-26T00:41:40+5:302015-07-26T00:41:40+5:30
माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही माळीणचे लोक पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या १२५ चौरस फूट जागेत राहत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे माळीण पुनर्वसनाची जागा लवकर
घोडेगाव : माळीण दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही माळीणचे लोक पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या १२५ चौरस फूट जागेत राहत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे माळीण पुनर्वसनाची जागा लवकर निश्चित झाली नाही. प्रशासनाने जागा शोधण्याचा भरपूर प्रयत्न केला; मात्र आवश्यक आठ एकर जागा व ग्रामस्थांच्या सोयीची जागा लवकर न मिळाल्याने पुनर्वसन रखडले आहे.
दि. ३० जुलै २०१४ रोजी माळीण येथे अतिवृष्टीमुळे गावावर दरड कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये ४४ कुटुंबांतील १५१ लोक मरण पावले. या दुर्घटनेत पूर्ण घरे गाडली गेली. यातूनही सुदैवाने वाचलेल्या लोकांचे तात्पुरते पुनर्वसन तातडीने करण्याची आवश्यकता होती. यासाठी माळीण फाट्यावरील शाळेच्या पटांगणावर ४० तात्पुरती निवारा शेड बांधून येथे व्यवस्था करण्यात आली.
तात्पुरता निवारा झाला; मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा शोधून तातडीने पक्की घरे बांधणे हे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. हा आदिवासी व दुर्गम भाग असल्याने येथे पडीक जागा भरपूर असतील व जागा मिळून जाईल, असा प्रशासनाचा समज होता. पहिल्या टप्प्यात आडिवरे, झांजरेवाडी व कोकणेवाडी या तीन जागा पाहण्यात आल्या. आडिवरे जागेला माळीण ग्रामस्थांनी सहमतीदेखील दिली; मात्र आडिवरे ग्रामस्थांनी जागा देण्यास तीव्र विरोध केला.
सष्टेंबर २०१४ मध्ये झांजरेवाडी व कोकणेवाडीच्या जागेला जागामालकांनी संमती दिली. यातील झांजरेवाडी जागेला जीएसआयने मान्यता दिली. प्रशासनालादेखील ही जागा आवडली; मात्र ती उंच डोंगरावर असल्याने दळणवळणास, शेतीकडे जाण्यास अवघड होईल, म्हणून माळीण ग्रामस्थांनी या जागेला नकार दिला. कोकणेवाडीची जागा लांब असल्याने या जागेला कोणीच पसंती दिली नाही. यानंतर घोडेगाव येथे झालेल्या बैठकीत माळीण पुनर्वसनाची जागा ग्रामस्थांना विचारात घेऊनच निश्चित केली जाईल, कोणतीही जागा लादली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
या वेळी ग्रामस्थांनी तात्पुरती निवारा शेड असलेल्या कशाळवाडीच्या जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली. त्याप्रमाणे कशाळवाडीच्या जागेचा पाठपुरावा सुरू झाला. कशाळवाडीच्या जागेला जीएसआयची संमती नव्हती. जीएसआयने ही जागा धोकादायक असल्याचा प्राथमिक अहवाल दिला होता. तरीही ग्रामस्थांना जागा पसंत असल्याने प्रशासनाने जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. येथे चार एकर जागेला जागामालकांनी लेखी संमती दिली; मात्र अजून आवश्यक असलेली चार एकर जागा देण्यास उर्वरित जागामालकांनी नकार दिला. यामध्ये अनेक दिवस निघून गेले. माळीण पुनर्वसनाचा प्रश्न रखडला. जानेवारी २०१५मध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुन्हा सर्व महसूल यंत्रणा जागा शोधण्याच्या कामास लावली. प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, तहसीलदार बी. जी. गोरे, नायब तहसीलदार विजय केंगले, धनंजय भांगरे यांनी माळीण गावाच्या जवळपास जागा शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी माळीण गावाच्या पुढे चिंचेचीवाडी येथे व आमडे गावच्या हद्दीत असाणे रोडलगत दोन जागा पाहिल्या. त्यांपैकी चिंचेचीवाडी येथील जागेत माळीण ग्रामस्थांची भातखाचरे आहेत. या जागेत घरे झाली तर शेती कुठे करायची व खायचे काय, असा सवाल ग्रामस्थांनी केला. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना आमडेची जागा नेऊन दाखविण्यात आली. या जागेशिवाय आता पर्याय नाही व सर्व जागांपैकी ही जागा सोईची असल्याने ग्रामस्थांनी दि. १ फेब्रवारी २०१५ रोजी या जागेला संमती दिली.
जागामालक सचिन व संदीप लुमा आसवले यांच्याकडून चार लाख रुपये एकर याप्रमाणे ८ एकर जागा दि. ३१ मार्च रोजी तहसीलदार आंबेगाव यांनी माळीण पुनर्वसनासाठी यांनी खरेदी केली; परंतु त्यानंतरही काही माळीण ग्रामस्थांनी या जागेबाबत नाराजी व्यक्त केली, तर काही लोकांनी ही जागा मान्य केली आहे.
आम्हाला कशाळवाडीतच पुनर्वसन हवे आहे. आमडेची जागा आमच्या गावाबाहेर आहे. या जागेत दर लागत नाही. माळीण गावावर कोसळलेला डोंगर व आमडेच्या जागेचा डोंगर एकच आहे; त्यामुळे या जागेतही अशी दुर्घटना घडू शकते, अशा स्वरूपाच्या तक्रारी काही लोक करीत आहेत.
कशाळवाडीत पूर्ण जागा मिळत नाही व आमडेची जागा रस्त्यालगत आणि वाहतुकीस जवळ असल्याने काही लोकांनी ही जागा मान्य केली आहे. प्रशासनाने आमडेच्या जागेतच माळीणचे पुनर्वसन होईल. ही जागा खरेदी झाली आहे. आता जागा बदलली जाणार नाही, असे स्पष्ट सांगून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
३0 जुलैची काळरात्र
३0 जुलै २0१४ ची ती काळरात्र माळीण गाव होत्याचं नव्हतं करून गेली. ३0 जुलैच्या आधी दोन दिवस आंबेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. डोंगरावर पाणी मुरत होते. डोंगरात आणखी पाणी मुरण्यास जागा न राहिल्याने अख्खा डोंगरच मातीच्या राडारोड्यासह खाली आला आणि होत्याचं नव्हतं झालं...