अनास्थेमुळे जंगलाची होरपळ
By admin | Published: April 27, 2017 04:51 AM2017-04-27T04:51:06+5:302017-04-27T04:51:06+5:30
चैत्र वणव्याची मालिका अजूनही कायम असल्याचे ढाकाळे येथील भीषण वणव्याने अधोरेखित केले. ऐन उन्हाळ्यात वणव्याने
डेहणे : चैत्र वणव्याची मालिका अजूनही कायम असल्याचे ढाकाळे येथील भीषण वणव्याने अधोरेखित केले. ऐन उन्हाळ्यात वणव्याने सुपेवाडीपासून (ता. खेड) ढाकाळे (ता. आंबेगाव) येथील घाटरस्त्यातील गर्द वनराई आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने हजारो सागवृक्ष होरपळले आहेत, तर शेकडो वृक्षांचे बुंधे जळालेल्या अवस्थेत आहेत.
अचानक लागलेल्या या आगीत निसर्ग संपदेने नटलेला हा शेकडो हेक्टरचा परिसर काळाकुट्ट पडला आहे. ढाकाळे घाटात सागवान वृक्ष विपूल प्रमाणात असून वसंत ऋतूत सागाची पानगळ होते. हळूहळू पालापाचोळ्यांचा एक जाड थर तयार होतो. या परिसरात तापमानात फेब्रुवारी महिन्यापासूनच मोठी वाढ होत असल्याने हा थर सुकतो.
जंगलात झाडांपासून तुटून पडलेले, कापलेले किंवा वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली अनेक मोठी झाडे आणि फांद्या वाळलेल्या स्थितीत पडून राहतात. अशात जंगलाच्या एखाद्या भागात आग लागली, की, संपूर्ण जंगलच या आगीच्या विळख्यात येते. अशा आगीच्या तडाख्यात लाखमोलाची वनसंपदा नष्ट होते. परिसरात वेगाने वाढणारे तापमान, कोरडे वातावरण त्यामुळे ही आग जोरात पसरते.
या झाडांचे बुंधे पेट्रोल टाकल्यासारखे वेगाने पेट घेतात आणि साधारणत: २० मीटर उंचीचे हे देखणे जंगल पाहता पाहता नष्ट होते. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे वणवा आणखीनच भडकतो.
पालापाचोळ्याखाली रहाणारे अनेक लहान-मोठे कीटक, साप व इतर शेकडो सरपटणारे जीव होरपळून निघतात. पानगळी ओसरल्यावर वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना नवी पालवी फुटते. ही हिरवी वनस्पती तृणभक्षी प्राण्यांचा आवडता आहार असते; परंतु, वणव्यामुळे जमिनीवरील हिरवे गवत, पानेसुद्धा कोमजली जातात. सांबर, चितळ, ससा व अन्य तृणभक्षी प्राण्यांचा आहार नष्ट होतो. नाइलाजाने ते स्थलांतर करतात. बरेचदा ते जीवही गमावून बसतात. भीमाशंकर अभयारण्य, सह्याद्रीच्या पश्चिम घाटावरील अशी छोटी छोटी जंगलं वनव्यांपासून संरक्षित करण्याची जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)