मुठा कालव्यामुळेच डेंगी व साथीचे आजार; स्वच्छतेची जागरुक नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:21 PM2017-11-28T15:21:13+5:302017-11-28T15:30:25+5:30
शहरात तसेच हडपसर परिसरात आलेल्या डेंगी व तत्सम साथीच्या आजारांमागे मुठा कालव्याची अस्वच्छताच कारणीभूत आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नागरिकांच्या साह्याने कालव्याची स्वच्छता त्वरीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पुणे : शहरात तसेच हडपसर परिसरात आलेल्या डेंगी व तत्सम साथीच्या आजारांमागे मुठा कालव्याची अस्वच्छताच कारणीभूत आहे. या कालव्याची स्वच्छता त्वरीत केली गेली नाही तर असे आजार आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने नागरिकांच्या साह्याने कालव्याची स्वच्छता त्वरीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वसंत माने या वानवडी परिसरात राहणाऱ्या जागरूक नागरिकाने परिसरातील रहिवाशांच्या साह्याने याबाबत सविस्तर अभ्यास करून निवेदन तयार केले आहे. त्यांनी सांगितले, की हा कालवा अस्वच्छतेचे आगार झाला आहे. कालव्याला संरक्षक जाळ्या नाहीत, त्यामुळे नागरिक कचरा सरळ कालव्यात टाकतात. त्यातच कपडे, जनावरे, वाहने धुतली जातात. मेलेले उंदीर, घुशी कालव्यात टाकले जातात. त्यामुळे कालव्याच्या कडेने असणाऱ्या सर्व परिसरात दुर्गंधी, डास, चिलटे यांचे साम्राज्य आहे.
शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडले जाते, ते हडपसरच्या पुढे जाते. काही काळाने पाणी सोडणे थांबले की कालव्याचा तळ समपातळीत नसल्यामुळे तेथील अनेक खड्डयांमध्ये पाणी साचते. त्यात डास अळ्या तयार होतात. पुन्हा पाणी सोडले की या अळ्या पुढे प्रवासाला निघतात व पुढचा भागही प्रदुषित करतात. या कालव्याची स्वच्छता कोणी करायची हा प्रश्न आहे. कालव्यामध्ये कचरा टाकला जाऊ नये यासाठी तिथे कसली यंत्रणाच नाही. त्यामुळे अनेक महिने ही स्थिती अशीच आहे असे माने म्हणाले.
महापालिकेच्या आरोग्य विभागात त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. कालवा कचरा मुक्त करावा, त्याचा तळ सपाट करावा, काठावरील झाडी नियमीतपणे काढली जावीत, थांबलेल्या पाण्यावर औषध फवारणी करावी असे उपायही माने यांनी सूचवले आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी म्हटले आहे.