चंपाषष्ठीनिमित्त पुण्यातील धामणी येथील खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 04:19 PM2017-11-25T16:19:02+5:302017-11-25T16:49:36+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी येथील कुलस्वामी खंडेरायाच्या दर्शनासाठी चंपाषष्ठी निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
लोणी धामणी : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी येथील कुलस्वामी खंडेरायाच्या दर्शनासाठी चंपाषष्ठी निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध शष्ठी अर्थात चंपाषष्ठी हा कुलस्वामी खंडोबाचा जन्म दिवस धामणी गावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी ह. भ. प. मल्हारी महाराज शेवाळे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाबरोबर महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. कुलस्वामी खंडोबा देवास पांडुरंग केशव जाधव या धामणीतील भाविकाने खंडोबा देवाची प्रतिकृती म्हणून सव्वा दोन किलो वजनाचा चांदीचा मुखवटा सकाळी अभिषेक करून व गावातून पालखीतून मिरवणूक काढुन अर्पण केला.
दिवसभर सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात मंदीर परिसर भक्तिमय वातावरणात गजबजून गेला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकभक्तांनी सकाळ पासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यादिवशी भाविकांनी मंदिर परिसरात कुलदैवत खंडोबाची एक हजारांहून अधिक पाच नामाची जागरणे घातली. संध्याकाळी उशिरापर्यंत भाविक खोबरे, भंडाराची उधळण करत होते.
मंदिर परिसरात खोबरे, भंडार, खेळणी, इ दुकाने लावली होती. मंदिरातील दर्शनरांग तसेच पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन जीर्णोद्धार समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.