आरक्षण अर्जातल्या बदलांमुळे प्रवाशांना तिकिटास उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:51+5:302021-08-29T04:12:51+5:30
‘वेटिंग’चा वाढला त्रास : अर्ज भरण्यास लागतात दोन मिनिटे प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेचे आरक्षित ...
‘वेटिंग’चा वाढला त्रास : अर्ज भरण्यास लागतात दोन मिनिटे
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठीच्या अर्जात विचारण्यात येत असलेल्या माहितीमुळे प्रवाशांना अर्ज भरण्यास उशीर लागत आहे. अर्जातच जास्त माहिती असल्याने तिकीट काढतानादेखील वेळ लागत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना ‘वेटिंग’ मिळत आहे. अनेकदा ‘वेटिंग’ तिकीट नको म्हणून प्रवाशांना जास्तीची रक्कम देऊन तत्काळ कोट्यातून तिकीट काढावे लागत आहे. म्हणजे दोन्हीकडून प्रवाशांचे नुकसान होत आहे.
पहिल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आरक्षण फॉर्मात बदल केला. यात प्रवाशांचे नाव, पत्ता यासह तो कोणत्या शहरात जात आहे, का जात आहे, तिथला पूर्ण पत्ता, पिन कोडसह सर्व तपशील अर्जात लिहावा लागतो. त्यावेळी विलगीकरण केले जात होते. अशा स्थितीत प्रवाशांचा स्थानिक प्रशासनाला शोध घेण्यास मदत मिळावी म्हणून हा निर्णय घेतला गेला. मात्र, याचा फारसा फायदा झालाच नाही.
उलट प्रवाशांनाच फटका बसत आहे. आजही पद्धत सुरूच आहे. अनेकदा प्रवासी यात चुकीची माहिती देतात. त्यामुळे माहिती घेण्याचा उद्देशच सफल होत नाही. मात्र, या अनावश्यक माहिती देण्यासाठी लागणाऱ्या वेळामुळे पूर्वी ३० ते ४० सेकंदात मिळणाऱ्या तिकिटासाठी आता दीड ते दोन मिनिटे थांबावे लागत आहे. परिणामी, ‘जनरल कोट्या’सोबत तत्काळ कोट्याला देखील प्रतीक्षा आहे.
चौकट
लांब पल्ल्याच्या गाड्या लगेच ‘फुल्ल’
रेल्वे आरक्षण केंद्रावरून तिकीट काढताना प्रवाशांना संपूर्ण माहिती लिहून तो अर्ज घेऊन रांगेत उभे राहावे लागते. आरक्षण केंद्रातील कर्मचाऱ्यास एक अर्ज संगणक भरण्यास वेळ लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यासाठीचा तत्काळ कोटा काही मिनिटांतच भरून जातो. अनेकांना ‘वेटिंग’ तिकीट मिळत आहे.
चौकट
‘ऑनलाईन एजंटां’च्या पथ्यावर
“रेल्वे आरक्षण केंद्रावरून तिकिटे उशिरा व वेटिंग मिळत असल्याने तिकिटे कन्फर्म मिळावी म्हणून अनेक प्रवासी ऑनलाईन एजंटकडे वळत आहेत. एजंट फॉर्ममधील सर्व माहिती आधीच संगणकात भरून ठेवतो. कोट्याची वेळ सुरू झाली की तो फक्त एंटर मारून तिकीट काढतो. यासाठी तो प्रवाशांकडून जास्तीचे दर आकारून तिकीट देतो. प्रवासी देखील कन्फर्म तिकीट मिळत असल्याने एजंटला जास्तीचे पैसे देण्यास तयार होतात.
चौकट
“हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. यात पुणे विभागाची कोणती भूमिका नाही. जेव्हा तो रद्द होईल तेव्हा कळविले जाईल.”
-
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग , पुणे
चौकट
“संक्रमित प्रवाशांचा शोध तत्काळ लागावा म्हणून रेल्वे प्रशासनाने कोरोनाकाळात आवश्यक बदल केले. आता अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरू झाले. स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणे देखील बंद झाले आहे. अशात ही माहिती जमा करणे पूर्वी इतके गरजेचे राहिले नाही. किंबहुना हे आता प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे आरक्षण फॉर्म पूर्वीप्रमाणे करावे.”
-निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे.