हवामान बदलामुळे ३० ते ४० टक्केच कांदा लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:27 AM2021-02-20T04:27:41+5:302021-02-20T04:27:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळेगाव ढमढेरे : यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे कांदा पीक वाया ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव ढमढेरे : यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलामुळे बहुतांश शेतकरी वर्गाचे कांदा पीक वाया गेल्याने दर वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या हंगामात साधारण तीस ते चाळीस टक्केच कांदा लागवडी झाल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. यावर्षी कांद्याला बाजारभाव समाधानकारक असला तरी शेतकऱ्यांच्या हाती मालच नसल्याने शिरूर तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दरवर्षी बळीराजा ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान कांदा रोपे तयार करण्याची प्रक्रिया करीत असतो. ही रोपे तयार झाल्यानंतर साधारण दीड ते दोन महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान शेतकरी वर्ग कांद्याच्या रोपांची लावणी (लागवड) करतात. या वर्षीच्या कांदा रोप प्रक्रियेच्या दरम्यान निसर्ग कोपल्याने पावसाच्या अतिवृष्टीमुळे व हवामानातील मोठ्या बदलाने अक्षरशः अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्याची रोपे वाहून गेली. तर काही शेतकऱ्यांची रोपे अनेक दिवस पाणी साठून राहिल्याने जाग्यावरच सडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दर वर्षीच्या तुलनेत शिरूर तालुक्यात या वर्षी कांद्याचे पीक साधारण तीस ते चाळीस टक्केच दिसून येत आहे. सध्या अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर येऊन कांदा साधारण ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करीत आहेत. शेतकरी वर्गास कांद्याला बाजार भाव समाधानकारक मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या शेतात माल नसल्याने शेतकरी वर्ग मात्र हतबल झाल्याने आर्थिक विळख्यात सापडला आहे. विशेषता बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा पिकांवर आर्थिक नियोजन ठरलेले असते. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
चौकट:
या वर्षीच्या हंगामात ऑगस्टच्या दरम्यान दहा हजार रुपये पायलीप्रमाणे दोन पायल्यांचे कांदा बियाणे वीस हजार रुपये किमतीला खरेदी करून रोप प्रक्रियेसाठी शेतात लावले. परंतु तयार झालेली रोपे पावसाच्या अतिवृष्टीमुळे अक्षरश: वाहून गेली तर काही रोपे जाग्यावरच सडली गेली. तरीदेखील खचून न जाता शेवटच्या टप्प्यात अर्धा एकर पुन्हा कांदा रोपांची लागवड केली. परंतु त्यातीलही निम्मा कांदा सडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
-आबू भोसले (प्रगतशील शेतकरी, दरेकरवाडी)
फोटो ओळ: विठ्ठलवाडी येथे कांदा खरेदी करताना व्यापारी.