बंद घाटामुळे रोज भोर एसटी आगाराला ३५ हजारांचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 02:45 PM2019-08-21T14:45:35+5:302019-08-21T14:47:11+5:30
घाट बंद असल्याने भोर एसटी आगाराच्या दररोजच्या तीन गाड्या बंद झाल्यामुळे आगाराला दररोज ३० ते ३५ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे.
भोर : भोर-महाड रोडवरील वरंध घाट दरडी पडून रस्ता खचल्याने नादुरुस्त असल्यामुळे मागील १५ दिवसांपासून बंद असून कधी दुरुस्त होईल हे सांगता येत नसल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना व भाजीपाल्यासह इतर व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे. तर घाट बंद असल्याने भोर एसटी आगाराच्या दररोजच्या तीन गाड्या बंद झाल्यामुळे आगाराला दररोज ३० ते ३५ हजारांचा तोटा सहन करावा लागत आहे.
मागील १५ दिवसांपासून भोर एसटी आगाराच्या स्वारगेट-भोर-महाड सकाळी ६ वाजता व ७.४५ वाजता, तर दुपारी ३.३० वाजताची स्वारगेट-भोर-महाड-पोलादपूर गाडी अशा तीन गाड्या बंद आहेत. यामुळे दररोज ८ फेऱ्यांप्रमाणे ८२३ किलोमीटरचा प्रवास थांबला असून भोर आगाराचे दररोज ३० ते ३५ हजारांचे नुकसान होत असल्याचे भोर एसटी आगाराच्या आगारप्रमुख स्वाती आवळे यांनी सांगितले. तर, भोर तालुक्यातील दुर्गाडी भागातील रस्ता खराब झाल्याने सकाळी ८.१५ वाजता, दुपारी २.४५ वाजता व सायंकाळी ६ वाजताची दुर्गाडी गाडी कुडलीपर्यंतच जाते. त्यामुळे येथील नागरिकांना व मुलांना पाच ते सहा किलोमीटर चालत जावे व यावे लागत आहे.
रायरी गावाला जाणारी दुपारी १२.४५ वाजताची एसटी रस्त्याच्या कामामुळे दुपारी व संध्यकाळी जात नसल्यामुळे गावातील ३० ते ३५ मुलांना रायरी गावाच्या फाट्यावरून दोन किलोमीटर दररोज सकाळी व संध्याकाळी पुन्हा २ किलोमीटर चालत यावे लागत आहे.एसटी तास-दोन तास उशिराने सोडली जाते, तर भोर-महाड रोडवरील शिरगाव येथे रस्ता खचल्यामुळे एसटी गाडी शिरगावपर्यंतच जात असल्याने शिळिंब व परिसरातील हिर्डोशी येथील विद्यालयात येणाºया मुलांना ७ किलोमीटर चालत येऊन पुन्हा ७ किलोमीटर असे १४ किलोमीटर दररोज चालत जावे लागत आहे.यामुळे मुलांचे व काही कामानिमित्त नीरा-देवघर धरण भागात येणाºया प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे महाड रोडवरील रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे.
वरंध घाटातील भोर हद्दीत चार ते पाच ठिकाणी दरडी पडल्या होत्या, त्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, शिरगाव गावाजवळ व पवार हॉटेलच्या जवळही खचलेला रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यात आला, त्याची कायमस्वरुपी दुरुस्ती करणे याशिवाय रस्त्याला पडलेले खड्डे भरणे महत्त्वाचे आहे.तर महाड तालुक्याच्या हद्दीत रस्त्यावर वारंवार दरडी पडत असून अनेक ठिकाणी अधिक प्रमाणात रस्ता खचला आहे.याची पाहणी महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असून वरंध घाटाचे सर्वेक्षण शासनाच्या भूगर्भ शास्त्रा कडून करण्यात आले आहे.मात्र, त्याचा अहवाल अद्याप आला नसून त्यांचा अहवालाच घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.त्यामुळे वरंध घाटातील वाहतूक कायमस्वरुपी बंद होते की काय, अशी शंका प्रवाशांच्या मनात येत आहे.
भोर-गुढे-निवंगण ते कुडली बुदुक काठरस्ता मार्गाने पोलादपूरला रस्ता हा एक चांगला आणी कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग असून मागील १५ ते २० वर्षांपूर्वी सदरच्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.मात्र, पुढील काम बारगळल्याने हा रस्ता होऊ शकला नाही. सदरच्या रस्त्याचे पुन्हा सर्वेक्षण करुन रस्ता करण्याची मागणी होत आहे.
....
भोरवरून महाडला वाहतूक बंद झाल्याने भाजीपाला घेऊन जाणारे व्यापारी,कोकणात जाणारे प्रवासी व पर्यटक यांना ताम्हिणी घाटातून जावे लागते.यामुळे प्रवास खर्च अधिक प्रमाणात वाढत आहे. 2याचा भुर्दंड पर्यटक व प्रवाशांना बसत आहे. या शिवाय घाटातील नादुरुस्त रस्ते घाटात दरड कोसळ्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे सदरचा घाटही धोकादायक आहे. 3सह्याद्रीच्या रांगांमध्ये मागील अनेक वर्षांपासून होत असलेले बदल घाट माथा परिसरात केलेले उत्खनन, निर्सग संपत्तीची हानी, झाडांची होत असलेली तोड जमिनीची होणारी धूप यामुळे सदरचा घाटा दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. यावर शासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.