टोलविरोधातील बंदमुळे उद्योगनगरीत मालवाहतूक ठप्प
By admin | Published: October 2, 2015 12:43 AM2015-10-02T00:43:22+5:302015-10-02T00:43:22+5:30
देशभरातील माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरी पिंपरी- चिंंचवडला बसला. गुरुवारी मालवाहतूक ठप्प झाली होती.
पिंपरी : देशभरातील माल वाहतूकदारांनी पुकारलेल्या बेमुदत बंदचा फटका उद्योगनगरी पिंपरी- चिंंचवडला बसला. गुरुवारी मालवाहतूक ठप्प झाली होती.
देशभरातील टोल बंद करावा, या मागणीसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे. बंदचा गुरुवारचा पहिला दिवस होता. बंदला प्रतिसाद देत निगडीतील ट्रान्सपोर्टनगर, तळवडे, चिखली, ताथवडे, दिघी, विश्रांतवाडी, चाकण आदी ठिकाणच्या जवळपास आठ हजार मालवाहतूक गाड्या बंद आहेत. ट्रान्सपोर्टनगरीत ट्रॅक, ट्रॉली आणि अवजड वाहने सकाळपासून थांबून होती. त्यावरील चालक आणि क्लिनर बसून होते. मालवाहतूक बंदमुळे औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होणार आहे. मालाची ने-आण न झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. विशेषत: मोठे उद्योग आणि कारखान्यावर त्याचा अधिक परिणाम जाणवणार आहे.
या संदर्भात आॅल इंडिया ट्रान्सपोर्ट कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, ‘‘शहरासह राज्यातील संघटनेला संलग्न शाखा बंदमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे जवळजवळ सर्वच गाड्या एका ठिकाणी थांबल्या आहेत. मालवाहतूक पूर्णपणे बंद आहे. जोपर्यंत टोलची वसुली बंद होत नाही, तोपर्यंत बंद सुरू राहील. टोलमुळे माल वाहतूक करणे अधिक गैरसोईचे, तसेच आर्थिक भुर्दंड देणारे ठरत आहे. टोल त्वरित बंद करून माल वाहतूकदारांना केंद्र सरकारने दिलासा द्यावा.’’ (प्रतिनिधी)