दरडी कोसळल्याने आहुपे खोऱ्याशी संपर्क तुटला
By admin | Published: June 30, 2017 03:34 AM2017-06-30T03:34:33+5:302017-06-30T03:34:33+5:30
भीमाशंकर-पाटण खोऱ्याची नाळ आहुपे खोऱ्याशी जोडणारा कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर नागमोडी वळणे असणाऱ्या घाटामध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : भीमाशंकर-पाटण खोऱ्याची नाळ आहुपे खोऱ्याशी जोडणारा कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर नागमोडी वळणे असणाऱ्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने भीमाशंकर-पाटण खोऱ्याचा आहुपे खोऱ्याशी संपर्क तुटला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर-पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भीमाशंकर व पाटण ही दोन खोरी तिसऱ्या असणाऱ्या आहुपे खोऱ्याशी जोडणाऱ्या कुशिरे-भोईरवाडी रस्त्यावर असणाऱ्या अतिशय अवघड अशा या नागमोडी वळणाच्या घाटामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यामुळे हा घाट अक्षरश: धोकादायक बनला आहे.
घाटाच्या कडेला असणाऱ्या डोंगरावरचे मोठमोठाले दगड व माती रस्त्यावर आल्यामुळे आहुपे खोऱ्याचा भीमाशंकर व पाटण खोऱ्याशी येणारा संपर्क तुटला आहे. आहुपे खोऱ्यातील गावे ही अतिशय डोंगर-दऱ्या खोऱ्यांमध्ये वसली आहेत. या भागामध्ये कोणत्याही सोईसुविधा नसल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला भीमाशंकर खोऱ्यामध्ये नेहमीच यावे-जावे लागते. आहुपे भागातील आदिवासी बांधवांची नेहमीच पाटण व भीमाशंकर परिसरामध्ये दररोजची वर्दळ आहे.
आहुपे खोऱ्यातील आहुपे, पिंपरगणे, अघाणे, तिरपाड, नानवडे, कोंढरे, भोईरवाडी या गावांतील आदिवासी बांधवांना आठवडे बाजार, आजारी पडल्यानंतर दवाखाना, या भागातील आदिवासी मुलांना शिक्षणासाठी भीमाशंकर खोऱ्यामध्ये यावे लागते. यांना येण्या-जाण्यासाठी कोंढरे-भोईरवाडी मार्गे कुशिऱ्यामध्ये येऊन म्हाळुग्यांमार्गी तळेघरला यावे लागते. याच रस्त्यावरती असणाऱ्या कुशिरे भोईरवाडीदरम्यान असणाऱ्या अतिशय नागमोडी वळणे असणाऱ्या घाटामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून मोठमोठाले दगड रस्त्यावर आल्याने बऱ्याच वेळा वाहतूक बंद होऊन या दोन्ही खोऱ्यांचा संपर्क तुटला जातो. आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ या घाटाची रुंदी वाढवून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते रमेश लोहकरे, कुशिऱ्याचे उपसरपंच दिलीप मुदगुण, उपायुक्त खेवजी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव घोईरत यांनी केली आहे.