...तर पावसाळ्यात सिंहगडावर जाणे होऊ शकते मुश्किल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 08:35 AM2019-05-20T08:35:03+5:302019-05-20T08:40:01+5:30
गिर्यारोहकांसह पर्यटक आणि तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्या जाणा-या सिंहगड किल्ल्यावरील दुरूस्तीची कामे अद्यापही अपूर्णच आहे.मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे
पुणे: गिर्यारोहकांसह पर्यटक आणि तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्या जाणा-या सिंहगड किल्ल्यावरील दुरूस्तीची कामे अद्यापही अपूर्णच आहे.मान्सूनच्या आगमनाला काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी गडावरील रस्त्याच्या डांबरी करणाचे, दरड प्रवण भागात लोखंडी जाळी बसविण्याचे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंती उभारण्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आहे.
वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादामुळे गेल्या काही वर्षांपासून सिंहगड किल्ल्यावरील रस्त्याच्या दुरूस्तीची कामे रखडली होती.त्याचप्रमाणे गडावरील दरड प्रवण भागात लोखंडी जाळी बसविण्यास विलंब होत होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टप्प्या-टप्प्याने रस्त्याच्या दुरूस्तीची आणि लोखंडी जाळी बसविण्याची कामे सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दुरूस्तीसाठी काही महिने गडावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे गडावर सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता तयार झाला. त्यामुळे गडावर जाणे-येणे सुखकर झाले आहे.
सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी डांबरी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, पुढील दोन दिवसात रस्त्याच्या डांबरिकरणाचे काम सुरू करण्याते येणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी जाळीचा वापर करून सुरक्षा भिंती उभ्या केल्या जात आहेत. तसेच दरड प्रवण भागात जाळी बसविण्याचे साहित्य येवून पडले आहे. दरड कोसळण्याची शक्यता असणा-या भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करावे लागणार आहे.पाऊस सुरू झाल्यानंतर दुरूस्तीची प्रलंबित कामे करता येणार नाहीत.त्यामुळे पुढील काही दिवसातच सर्व कामे पूर्ण करण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभगासमोर आहे.
सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एन. देशमुख म्हणाले, सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पर्यटकांना गडावर येण्यास कोणत्याही अडचणी येत नाहीत.एका वळणावर केवळ 12 मिटर रुंदीचा सिमेंटचा रस्त्या आहे. परंतु, पर्यायी उपाययोजना करून या रस्त्याची रूंदी वाढविली जाईल. त्याचप्रमाणे सध्या गडावर रस्त्याच्या डांबरी करणाचे काम सुरू आहे.रविवार असल्यामुळे काम बंद ठेवले होते. मात्र,येत्या मंगळवारपासून रस्त्याचे अपूर्ण काम सुरू केले जाईल.
गडावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणा-या विविध उपाय योजना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केल्या जाणार आहेत.सुरक्षेचा भाग म्हणून गडावरील रस्त्यावर रिफ्लेक्टर लावले जातील. सध्या गडावरील काही कामे अपूर्ण असल्याचे दिसून येत असले तरी पुढील 15 दिवसात सर्व उर्वरित कामे केले जातील.
-डी.एन.देशपांडे,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम,दक्षिण विभाग,पुणे
पावसाळ्यात गडावर गर्दी वाढण्याची शक्यता
उन्हाचा चटका बसत असल्यामुळे रविवारी (दि.19) सुट्टी असूनही सिंहगडावर फारशी गर्दी झाल्याचे दिसून आले नाही. परतु,गडावर जाण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.त्यातच पुढील काही दिवसात गडाच्या पायथ्यापासून ते गडापर्यंतचा रस्ता चांगला होईल.परिणामी पावसाळ्यात गडावर पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येईल,असे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांनी सांगितले.