गणेश महोत्सवावरून महापालिकेत वादंग; उधळपट्टीचा शिवसेनेचा आरोप, भाजपाचीही टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 05:08 AM2017-08-23T05:08:59+5:302017-08-23T05:09:01+5:30
महापालिका गणेश महोत्सवात उधळपट्टी होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वसाधारण सभेत आघाडी उघडण्यात आली.
पुणे : महापालिका गणेश महोत्सवात उधळपट्टी होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वसाधारण सभेत आघाडी उघडण्यात आली. शिवसेनेने सभागृह डोक्यावर घेतले तर सत्ताधारी भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देत सभाच तहकूब केली.
महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज सुरू झाले. लगेचच शिवसेनेने गणपतीचा मुखवटा लावलेल्या नगरसेवक बाळा ओसवाल यांना पुढे आणले. सर्व सदस्यांच्या हातात काळे फलक धरलेले होते. त्यावर उधळपट्टीचा निषेध करण्यात आला होता. फलक फडकावण्याबरोबरच शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी घोषणाही देण्यास सुरुवात केली. त्यांना पृथ्वीराज सुतार, पल्लवी जावळे आदी सदस्यांनी साथ दिली. त्यानंतर लगेचच भाजपाची नवोदित सदस्यांची फळीही पुढे आली. प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, सम्राट थोरात, अमोल बालवडकर तसेच वर्षा तापकीर, मंजुश्री खर्डेकर आदी सदस्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने भाजपाने गणपतीची आरती सुरू केली. तरीही शिवसेनेच्या घोषणा सुरूच होत्या.
राष्ट्रवादी व काँग्रेसचे सदस्य यावेळी मागील बाकांवर शांत बसून होते. भाजपाच्या पदाधिकाºयांनीही मागे बसणेच पसंत केले. थोड्या वेळाने महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब करीत असल्याची घोषणा केली.
भामा आसखेड या महापालिकेने पूर्व भागासाठी प्रस्तावित केलेल्या पाणी योजनेला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. त्याचा निषेध करणारा ठराव भाजपाच्या कर्णे गुरूजी यांनी या गोंधळातच मांडला. सभा तहकुबीसाठीही हेच कारण देत शिवसेनेवर भाजपाने कुरघोडी केली.