कोरोना व लाॅकडाऊनमुळे आंबा खरेदीला ग्राहकच मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:55+5:302021-05-13T04:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेले वर्षभर दर महिन्याला झालेला पाऊस, चक्रीवादळ, गारपीट या निसर्ग आपत्तीमुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये २०-२५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेले वर्षभर दर महिन्याला झालेला पाऊस, चक्रीवादळ, गारपीट या निसर्ग आपत्तीमुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये २०-२५ टक्के घट झाली. आता कोरोना आणि लाॅकडाऊनच्या संकटामुळे आंबा मार्केटमध्ये आणणे आणि विक्री करण्यात अनेक अडचणी येत आहे. यामुळेच आवक वाढली, पण लाॅकडाऊनमुळे अपेक्षित मागणी नसल्याने दर कमी झाले आहेत.
राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लाॅकडाऊन सुरू झाला. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेला लाॅकडाऊन आणि दुकाने सुरू ठेवण्यावर घातलेल्या मर्यादा यामुळे ऐन आंब्याच्या हंगामामध्ये ठोक बाजारातून आंब्याची उचल निम्म्याने घटली असून दरातही घसरण झाली आहे. याचा फटका विक्रेते आणि आंबा उत्पादकांना शेतकऱ्यांना बसला आहे.
पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात सध्या रत्नागिरी हापूस आंब्याची दररोज तीन ते साडे तीन हजार पेट्यांची आवक होते. तर सर्वाधिक आवक कर्नाटक हापूस आंब्याची दररोज २५-३० हजार पेट्याची आवक होते. याशिवाय केशर आणि गावरान आंब्याची देखील आवक सुरू झाली आहे.
--------
आंब्याचा काय दर (प्रती किलो)
रिटेल होलसेल
हापूस (रत्नागिरी) डझन ६००-८०० ४००-६००
हापूस (कर्नाटक) - ७०-१०० ४५-६५
केशर - ८०-१०० ४०-७०
पायरी - ४०-५० ३०-४०
--
आवक वाढली, ग्राहक रोडावले
सध्या जिल्ह्यात आंब्याचा हंगाम जोमात आहे, पण लाॅकडाऊनमुळे आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील तुलनेत ग्राहक खूपच कमी आहेत. सध्या पुणे शहरात दिवसाला सुमारे ३० ते ३५ हजार पेट्या आंब्याची आवक होते, पण त्या तुलनेत ग्राहक नाही. यामुळे दर पडले आहेत.
-------
घरपोच सेवेवर अधिक भर
सध्या सुरू असलेले लाॅकडाऊन आणि वेळीची मर्यादा यामुळे ऐन हंगामात आंब्याचा व्यापार करणे खूप कठीण झाले आहे. तयार आंबा बाजारात उपलब्ध असताना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागते. आतापर्यंत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ग्राहकांना तयार आंबा मिळणे कठीण असायचे. पण यंदा कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे उलटी परिस्थिती आहे. यामुळेच व्यापाऱ्यांना होमडिलिव्हरी हा एकमेव पर्याय आहे.
- अरविंद मोरे, आंब्याचे व्यापारी
--
आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत
निसर्ग आपत्ती आणि कोरोना व लाॅकडाऊनचे संकट यामुळे आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. निर्सगामुळे उत्पादनात २०-२५ टक्के घट झाली, तर कोरोना, लाॅकडाऊनमुळे मार्केटमध्ये मालाला उठाव नसल्याने अपेक्षित दर मिळत नाही.
- मकरंद काणे, शेतकरी, रत्नागिरी