‘कोरोना’मुळे आयटीवाल्यांचे घरून काम ; परदेशगमनावर आली बंधने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 10:30 PM2020-03-05T22:30:00+5:302020-03-05T22:30:02+5:30
हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्या
पुणे : कोरोना विषाणूचा जगभरात प्रादुर्भाव झाल्याचा परिणाम माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रावर दिसून येत आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर मर्यादा आणली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून घरून काम करण्याचा पर्यायदेखील दिला आहे.
‘आयटी’ची राज्याची राजधानी म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. देशातील आयटीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही पुण्याचा लौकिक आहे. हिंजवडी, वडगावशेरी, एरंडवणे, कल्याणीनगर या भागांत अनेक नामांकित आयटी कंपन्यांची कार्यालये आहेत. आयटी कंपन्यांमधील कर्मचारी कामासाठी जगभर प्रवास करीत असतात.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कर्मचाऱ्यांच्या परदेशवारीवर निर्बंध आले आहेत. युरोप-अमेरिकेतील अनेक देशांनी आशियाई देशातल्या व्यक्तींना व्हिसा देण्याच्या धोरणात बदल केला आहे. नियोजित परिषदा, बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत. यांसारख्या कारणांमुळे पुण्यातल्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या परदेशगमनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पुण्यातल्या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गापासून घ्यावयाची दक्षता, स्वच्छतेचे उपाय याची माहिती देण्यात येत आहे. काय करावे आणि काय करू नये, याच्या सूचना प्रत्येकाला ई-मेल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कंपन्यांमधले सामूहिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, घरून काम करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला आहे.
याबाबत सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर असोसिएशनच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे म्हणाले, ‘‘आमच्यासाठी कर्मचाऱ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी काय करावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कंपन्यांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक दक्षता घेतली जात आहे.’’
............................
पर्याय हातात ठेवावा लागेल : प्रदीप भार्गव
‘‘कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक, आॅटोमोबाईल आणि रसायन उद्योग काहीसा प्रभावित झाला आहे. मात्र कोणत्याही कंपनीतले काम कच्च्या मालाअभावी ठप्प झालेले नाही. या साथीमुळे कोणत्याही एका देशावर अथवा पुरवठादारावर अवलंबून न राहण्याचा धडा मिळाला आहे. चीनमधे वुहान सोडल्यास इतर ठिकाणच्या कारखान्यातील उत्पादन सुरू झाले आहे. तसेच, तेथून काही जहाजे रवानादेखील झाली आहेत. दोन ते तीन आठवड्यांत माल येईल. इलेक्ट्रॉनिक, रसायने यातून विषाणूचा प्रसार होत नसल्याने तसा धोका नाही,’’ असे मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी सांगितले. 000