देवी रडत असल्याची भिगवण परिसरात अफवा, अंधश्रद्धेपुढे मती चालेना, वस्तुस्थिती सांगूनही विश्वास बसेना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 03:01 AM2017-09-13T03:01:41+5:302017-09-13T03:01:41+5:30
देव दूध पितो अशी अफवा पसरली आणि देशभरात मंदिरासमोर भक्तांच्या रांगा लागल्या याला काही वर्ष लोटली. याच प्रकारची भिगवण परिसरातही अफवा पसरली आहे. तुळजापूरची देवी रडत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या मंदिराला भेट देऊन पाहिल्यानंतर ही अफवा असल्याचे सांगूनही यावर विश्वास महिलावर्ग ठेवत नसल्याचे दिसून येत आहे.
भिगवण : देव दूध पितो अशी अफवा पसरली आणि देशभरात मंदिरासमोर भक्तांच्या रांगा लागल्या याला काही वर्ष लोटली. याच प्रकारची भिगवण परिसरातही अफवा पसरली आहे. तुळजापूरची देवी रडत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्या मंदिराला भेट देऊन पाहिल्यानंतर ही अफवा असल्याचे सांगूनही यावर विश्वास महिलावर्ग ठेवत नसल्याचे दिसून येत आहे.
भिगवण गावातील चार नंबर वार्ड मध्ये तुळजापूर देवीचे मंदिर आहे. पुनर्वसन होण्यापूर्वी जुन्या गावात असणारी मूर्तीची याठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. काही वर्षापूर्वी देवीचा असणारा पितळी मुखवटा चोरीला गेल्यानंतर दगडी मुखवटा बसविण्यात आला आहे. याच मंदिरातील मूर्ती गेली चार दिवसापासून रडत आहे आणि देवीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत अशी अफवा कोणीतरी पसरवली. यावेळी देवीची सेवा करणाºया ताई सदाशिव बारहाते गावाला गेल्याने त्यांना याप्रकाराची माहिती मिळाली नाही. तर देवी रडतेय ही अफवा भिगवण परिसरात जोर धरू लागली. आसपासच्या तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी, कुंभारगाव पासून दौंड तालुक्यातील राजेगाव, कोशिमघर, टाकळी या गावातील हजारो महिला आणि भक्तांनी मंदिरासमोर रांगा लावीत पाहण्यासाठी गर्दी केली. तर याच अफवेत ज्या महिलेला एक मुलगा आहे तीने दारात रांगोळी काढून मध्यरात्री त्यावर दिवा लावावा अशी अफवा जोडली गेल्याने श्रद्धाळू महिलांनी त्यावर विश्वास ठेवून रांगोळीही काढली. त्यामुळे भिगवण परिसरात रात्रीच्या वेळेसही दारात दिवे पाहायला मिळत होते. ही अफवा नक्की कोणी पसरवली ही माहिती मिळत नसली तरी गेल्या दोन दिवसापासून आमच्या घरातील देवीचा फोटोतही देवी रडत असल्याचे सांगणारे दिवसभर भेटत होते.
यातील काही जण अशिक्षित असले तरी शिकलेसवरलेही अफवा आहे यावर विश्वास ठेवण्यास तयार होत नव्हते.
या मंदिराला जाऊन प्रत्यक्ष भेट दिली असता पूर्वेच्या दिशेला मुख असणाºया देवीच्या चेहºयावर चांदीचे डोळे बसविण्यात आले आहेत. त्याखाली गडद काळ्या रंगाच्या छटेवर दारातून उजेड पडल्याने तो भाग चमकत असल्याने तो पाणीदार दिसत आहे. त्यामुळेच कोणीतरी देवी रडत असल्याची अफवा पसरवली असल्याचे दिसून येत आहे. तर याठिकाणी सेवा करणाºया सेविका ताई बारहाते यांनी वर्षानुवर्षे देवीचा मुखवटा असाच असल्याचे सांगितले. तसेच मुखवट्यावर पाणी आढळून आले नसल्याचेही सांगितले.