सध्याच्या सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले - सुशीलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 05:36 AM2019-06-15T05:36:40+5:302019-06-15T05:37:01+5:30
सुशीलकुमार शिंदे : साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : सोशल मीडियामुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे अभिजन-बहुजन हा भेद काहीसा दूर झाला आहे. सध्या मोठी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे होत आहेत. समाजात भयावह घटना घडत आहेत, धार्मिक उन्माद वाढला आहे. कठीण काळातच कवीचे काम आव्हानात्मक असते, अशा शब्दांत कवी सुशीलकुमार शिंदे यांनी कवीचे भावविश्व ‘लोकमत’कडे उलगडले.
साहित्य अकादमीने कवितासंग्रहाची दखल घेतली याचा खूपच आनंद आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासारख्या काहीतरी लिहू पाहणाऱ्याला मिळालेली कौतुकाची थाप आणि पोचपावतीच आहे. मी ज्या लेखकांचे साहित्य वाचत मोठा झालो, त्यांनाच मी हा पुरस्कार समर्पित करतो, असे शिंदे यांनी सांगितले. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला मुंबईची पार्श्वभूमी आहे. मी मुंबईचे पाहिलेले जग, वेगवेगळे परिघ अशा पद्धतीने कवितासंग्रहामध्ये परिवेश मांडला आहे. ‘कोणत्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीरच असतो’, अशा ओळींमधून भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकरांची कविता मला खूप प्रभावी वाटते. लहानपणापासून मी भालचंद्र नेमाडे सरांचे साहित्य वाचतो आहे. माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्यावर एके दिवशी नेमाडे सरांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते की, २०१७ मध्ये सर्वात आवडलेली कविता म्हणजे ‘दहा बाय दहाची खोली’. अशा प्रतिक्रिया एका कवीला खूप समाधान देणाºया, प्रोत्साहन देणाºया असल्याचे त्यांनी सांगितले.
...तेव्हा कवी व्यथित होतो
कवी समाजाचाच एक घटक असतो. दाभोलकरांची हत्या होते, तेव्हा माणूस, कवी म्हणून मी प्रचंड व्यथित होतो आणि त्यातून कविता सुचू लागते. ‘उजेड पेरणाºया मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत’ अशी एक ओळ कवितेमध्ये आहे. शहरी आणि ग्रामीण, अभिजन आणि बहुजन असा फरक आता राहिलेला नाही, असे मला वाटते. सामाजिक माध्यमांतून साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे, असेही शिंदे म्हणाले.