लोकसंख्या ठरविताना महापालिकेचा होतोय गोंधळ, पाणी नियोजन अटळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 02:45 AM2018-12-27T02:45:32+5:302018-12-27T02:45:35+5:30
महानगरपालिकेकडून शहर आणि परिसराची लोकसंख्या ठरविताना गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
- विशाल शिर्के
पुणे : महानगरपालिकेकडून शहर आणि परिसराची लोकसंख्या ठरविताना गोंधळ उडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात लोकसंख्येचे वेगवेगळे दावे करण्यात आले असून, महापालिकेच्या सुधारित दाव्यानुसार शहर, कॅन्टोन्मेंट आणि परिसरातील लोकसंख्या ४८ लाखांवर आहे. जरी शहराची लोकसंख्या पन्नास लाख गृहित धरली तरी, सध्याच्या सूत्रानुसार साडेचौदा अब्ज घनफुटांपेक्षा (टीएमसी) अधिक पाणी शहराला देता येणे शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे पाणी नियोजन अटळ असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात आहे.
सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे शहराला लोकसंख्येनुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणीवापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला.
जलसंपदा विभागाने देखील महापालिकेला २० डिसेंबरला पत्र पाठवून ८९२ एमलडी पाणी उचलण्यास सांगितले. तसेच सध्याचा पाणीवापर १३५० एमएलडी असून, तो मंजूर पाणी कोट्यापेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
महापालिकेने सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या शपथपत्रानुसार शहराची लोकसंख्या ३९ लाख १८ हजार ७६३ इतकी असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या १ लाख ५८ इतकी आहे. सध्याच्या लोकसंख्या वाढीनुसार २०२२ पर्यंत ४४ लाख ३० हजार आणि २०३२ पर्यंत ५७ लाख ७१ हजार लोकसंख्या होईल. त्यानुसार २०३२ साली शहराला १२.८३ टीएमसी पाणी पुरेसे असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
जलसंपदा विभागाने कालवा समितीचा हवाला देत ११.५०
टीएमसी पाणीवापर करण्यास सांगितले आहे. शहर आणि कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या ४० लाख ७६ हजारावर आहे. त्यात आणखी दहा लाख लोकसंख्येची भर पडली तरी साडेअकरा टीएमसीच्या सूत्रानुसार फारतर १४.५० टीएमसीच पाणी मिळेल.
लोकसंख्या ठरविताना महापालिकेचा उडतोय गोंधळ
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला दिलेल्या शपथपत्रात महापालिकेने जून २०१७ मध्ये शहराची लोकसंख्या ३९,१८,७७३ असल्याचे सांगितले. १७ आॅक्टोबर २०१७ रोजी कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या १,५८,०११ अशी शहर-ग्रामीण ३९ लाख १८ हजार ७७३ अशी मिळून ४० लाख ७६ हजार ७७४ लोकसंख्येचा दावा.
२२ नोव्हेंबर २०१८ रोजी शहर, कॅन्टोन्मेंट आणि परिसराची लोकसंख्या ४८ लाख १० हजार २८३ असल्याचे नमूद केले आहे.
ग्रामपंचायती घेतात महापालिका आणि जलसंपदा विभागाकडूनही पाणी
महापालिकेने कळविलेल्या एकूण लोकसंख्येत २१ ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येचा देखील समावेश आहे. त्यातील काही ग्रामपंचायती या जलसंपदा विभागाकडूनदेखील पाणी घेतात.
अशा ग्रामपंचायतींची तपासणी महापालिका आणि जलसंपदा विभागाला संयुक्तपणे करावी लागेल, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.