जात पडताळी समितीच्या निर्णयामुळे उमेदवारांची होणार धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:07+5:302020-12-22T04:12:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यात पुणे जिल्हयातील ७४६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
याव्दारे उपरोक्त ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की, दि. १ ऑगस्ट २०२० पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करावेत. तदनंतर त्याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावेत. जुन्या पध्दतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत, असे आवाहन पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त नितीन ढगे यांनी केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत आहे. मात्र जात पडताळणी समितीच्या या निर्णयामुळे उमेदवारांची धावपळ होणार आहे.