मतदारयादीत मृत घोषित केल्याने ‘ज्येष्ठ’ मतदानाच्या हक्कापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 01:54 PM2019-04-24T13:54:30+5:302019-04-24T13:55:41+5:30
शासनाने चक्क या ज्येष्ठ नागरिकाला मतदानयादीत मृत घोषित केले आहे.
बारामती : शहरात एका ज्येष्ठ नागरिकाला शासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणाचा अनुभव ऐन मतदानाच्या दिवशी आला. शासनाने चक्क या ज्येष्ठ नागरिकाला मतदानयादीत मृत घोषित केले आहे. त्यामुळे जिवंत असूनदेखील मतदानाच्या अधिकारापासून या नागरिकाला वंचित राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला.
दीपक लक्ष्मण भराटे (वय ६०) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. भराटे प्रत्येक वेळी शहरातील राधेश्याम ऐन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे मतदान करतात. मंगळवारी (दि.२३) देखील ते मतदान ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर पोहचले. मात्र, तेथील अधिकाºयांनी त्यांना रोखले. शासकीय मतदानयादीनुसार तुम्ही मृत आहात. त्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे मतदान अधिकाºयांनी भराटे यांना सुनावले. त्यामुळे जिवंतपणी ‘मृत’ यादीत नाव गेल्याने भराटे संतप्त झाले. त्यांनी त्यांची सर्व शासकीय कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांना सादर केली. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान न करू देण्याची भूमिका कायम ठेवली.
शेवटी भराटे यांनी तहसीलदार, निवडणूक यंत्रणेकडे याबाबत तक्रार केली. तरीदेखील उपयोग झाला नाही. त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. तुम्हाला नव्याने नोंदणी करावी लागेल, असे सांगुन त्यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला.
......
दीपक भराटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, मतदान यंत्रणेने मला परस्पर मृत घोषित केले. त्यांना पुरावे देऊनदेखील त्यांनी माझी जिवंतपणाची दखल घेतली नाही. वास्तविक मी माझे वडील लक्ष्मण भराटे यांच्या मृत्यूचा दाखला प्रशासनाकडे दिला होता. मात्र, प्रशासनाने वडिलांऐवजी माझ्याच मृत्यूची नोंद केल्याचा धक्कादायक अनुभव आल्याचे सांगितले.