अधिवास कमी झाल्याने जुन्नरमध्ये फुलपाखरांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:09+5:302021-08-20T04:16:09+5:30
जुन्नर तालुक्यात फुलपाखरांच्या सुमारे १०० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. यात प्रामुख्याने ब्ल्यू मॉर्मोन, पायरोच्या विविध जाती, परदेशी, ग्रास ...
जुन्नर तालुक्यात फुलपाखरांच्या सुमारे १०० पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. यात प्रामुख्याने ब्ल्यू मॉर्मोन, पायरोच्या विविध जाती, परदेशी, ग्रास येलो, कॉमन क्रो, येलो पॅनसी, ब्ल्यू ओक लीफ, चांदवा, बॅरोनेट, कॉमन लेपर्ड, कॉमन सेलर, कॉमन सिल्वर लाईन यांच्यासह आदी प्रजातींची फुलपाखरे आढळतात. पावसाळा हा फुलपाखरांचा प्रजननाचा काळ आहे.
आपण सर्वांनीच लहानपणी फुलपाखरांमागे पळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असेल. फुलपाखरे पकडायची आणि काडीपेटीत ठेवायची हा एक सर्वात आवडता खेळ होता. कधी कधी फुलपाखरं पकडताना त्याचे रंग आपल्या बोटांना लागायचे. हा अद्भुत कीटक आजही लहान मुलांना आकर्षित करतो. आईच्या आणि आजीच्या गोष्टींमध्ये तसेच बालगीतांमध्येही फुलपाखरांचा विशेष स्थान आहे. फुलपाखरू म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर खवलेधारी कीटक आहेत.
जगभर फुलपाखरांच्या लाखभर प्रजाती आहेत आणि नुसत्या भारतात दीड हजाराहून अधिक फुलपाखरांच्या नोंदी आहेत. फुलपाखरू हा कीटक शष्टपाद प्रकारात मोडणारा आहे. बऱ्याचदा फुलपाखरू आणि पतंग यांच्यामध्ये गल्लत होते. परंतु हे दोन्ही वेगळे आहेत. अंडी, अळी किंवा सुरवंट, कोशीत आणि फुलपाखरू अशा चार भागांत फुलपाखरांचा जीवनप्रवास पूर्ण होतो. फुलपाखरांचे पंखांवर खवले असतात. या खवल्यांत पोकळी आणि रंग भरलेले असतात. खवल्यांमधील पोकळीमुळे फुलपाखरू सहज हवेत तरंगू शकते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते
पावसाळ्यात बऱ्याच पक्षांची पिल्ले जन्माला येतात. नेमक्या याच वेळी फुलपाखरांची संख्या अधिक असते. पक्षी विशेषतः वेडा राघू, कोतवाल, बुलबुल, ब्राह्मणी मैना व इतर पक्षी फुलपाखरांना व त्यांच्या सुरवंटांना पकडून पिल्लांना खाऊ घालतात. फुलपाखरे अधिवास निरोगी आहे की नाही हे सुद्धा दाखवतात. जिथे फुलपाखरांची संख्या अधिक तिथला अधिवास उत्तम स्थितीत आहे असे मानले जाते. या सर्व कारणांमुळे फुलपाखरांचे निसर्गातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक फुलपाखरू हजारो फुलांना भेटी देते त्यामुळे फुलांच्या परागीभवनात त्यांचा मोलाचा वाटा आहे. एवढं महत्त्व असूनही फुलपाखरांचा दिवसेंदिवस ऱ्हास होतो आहे हे सत्य नाकारता येणार नाही. रासायनिक शेती, कीटकनाशकांचा वापर, जंगलतोड, गवताळ कुरणांचं शेतीत रूपांतर, शिकार अशा अनेक गोष्टी फुलपाखरांच्या ऱ्हास होण्यास कारणीभूत आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात फुलपाखरांची तस्करी होते. ही फुलपाखरे, संशोधन, सुशोभीकरण किंवा माणकं तयार करण्यासाठी वापरली जातात.
----------------
"फुलपाखरांचं प्रमाण कमी होणं हे निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. फुलपाखरांचं पर्यावरणातील महत्त्व खूप मोठं आहे. जैवविविधतेत फुलपाखरे मोलाची भर घालतात. फुलपाखरं सुंदर असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने त्यांना वेगळं महत्त्व आहे. फुलपाखरं अन्नसाखळीत मोलाची जबाबदारी पार पाडतात. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी आपल्याला त्यांच्या अधिवासाचं संवर्धन करावं लागेल."
- राजकुमार डोंगरे, वनस्पती व निसर्ग अभ्यासक, खोडद, ता. जुन्नर
================================
टीप - फुलपाखरांचे आणखी काही फोटो ईमेल वर पाठवले आहेत, कृपया ई मेल वरून घेणे.
190821\20210819_141100.jpg
जुन्नर तालुक्यात फुलपाखरांचा अधिवास नष्ट होऊ लागल्याने फुलपाखरांची संख्या आता घटू लागली आहे