पुलं मानधनाच्या विलंबामुळे चित्रपटसृष्टीत रमले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 06:12 PM2018-11-19T18:12:34+5:302018-11-19T18:24:27+5:30
पैसे बुडविण्याची वृत्ती म्हणजे चित्रपट सृष्टीला लाभलेला शाप आहे..
पुणे : पुलंनी साहित्य, रंगभूमीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीमध्येही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. १९४८ ते ५२ या काळात पुलंच्या नावावर १९ चित्रपट होते. मात्र, मराठी चित्रपट सृष्टीत मानधन मिळण्याबाबत होणा-या विलंबामुळे पुलं चित्रपट सृष्टीत फार काळ रुळले नाहीत. आपणहून मानधन मागण्याचे पुलंना कधीच धाडस झाले नाही. पैसे बुडविण्याची वृत्ती म्हणजे चित्रपट सृष्टीला लाभलेला शाप आहे, अशा संवादसूरामधून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल देशपांडे यांचे चित्रसृष्टीपासून दूर राहाण्यामागचे वास्तव उलगडले.
‘पु.ल.परिवार’आणि आशय सांस्कृतिक’च्या वतीने आणि स्क्वेअर १च्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवात 'चित्रपट नाटकातील पु.ल.' हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये माधव वझे, आनंद माडगूळकर, आणि किरण यज्ञोपवीत सहभागी झाले होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.
माधव वझे म्हणाले, जागतिक स्तरावर ज्या ज्या दर्जेदार कलाकृती दिसल्या त्या त्या त्यांनी मराठीमध्ये आणल्या हे त्यांचे देणं आहे. ' तुझं आहे तुझपाशी' स्वत:बद्दलचा गोंधळ आहे. ' मी कोण ? हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. तर ' ती फुलराणी' हे विनोदी नाटक नाही ती शैली आहे ते एक भाषिक सत्ताकारण आहे. ते त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर खेळवले. प्रत्येक नाटकाची संगती लावताना पुलंना राजकीय धारणा नव्हती. पुलंनी लेखनातून कुणाला अडचणीत आणले नाही निखळ विनोद,भाषेची शब्दसंपदा प्रयोगक्षम नाटके दिली. मध्यमवर्गीय समाजाने ' तीन पैशाचा तमाशा' कडे दुर्लक्ष केले..पुलंनाही ते बसवलेले नाटक पटले नव्हते.
आनन्द माडगूळकर यांनी पुलंच्या चित्रपट कारकिर्दीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, चित्रपट अभिनेता म्हणून पुलं प्रकाशझोतात आले तो चित्रपट म्हणजे ' वंदे मातरम'. संवादातल्या वेगळ्या पातळीची गदिमा आणि पुलंना उपजत जाण होती. संवाद विशिष्ठ लकबीमध्ये उच्चारणं तरीही त्यांच्यात स्पष्टता असणं ही पुलंच्या लेखनाची खासियत होती. त्याकाळात मराठी चित्रपटांमध्ये मारामारीचे प्रसंग किंवा नृत्य पाहणे म्हणजे शिक्षा असायची. पडद्यावरची मारामारी खरी वाटावी असा आभास निर्माण व्हायला हवा. मात्र तसे कधीच दिसले नाही. किरण यज्ञोपवित यांनी बिन पैशाचा तमाशा' मधून एका वेगळ्या फॉर्ममध्ये पाहाता आले. पण हे नाटक सादर करताना जो रंगमंचीय अवकाश आणि कलाकार हवेत ते मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.