ग्रामसेवकांच्या संपामुळे हवेली तालुक्यातील गावगाडा झाला ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 04:22 PM2019-09-01T16:22:10+5:302019-09-01T16:23:07+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रासह हवेली तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात २२ हजार ग्रामसेवकांनी पुकारलेल्या संपामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली असून गावातील नागरिकांना शासकीय व वैयक्तिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रासह हवेली तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
ग्रामसेवकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२ हजार ग्रामसेवकांनी सविस्तर मागण्या पूर्ण न झाल्यास संप करण्यात येणार असल्याची कल्पना २२ जुलै रोजी शासनाला दिली होती. ग्रामसेवकांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नसल्याने ९ ऑगस्ट पासून असहकार आंदोलन सुरु केले. मात्र तरीही शासनाने निर्णय न घेतल्याने २२ ऑगस्ट पासून ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे स्वच्छ भारत सर्वेक्षणाचे काम थांबलेले असून , नागरिकांना विविध प्रमाणपत्र मिळत नाही, शासन स्तरावर कोणत्याही विभागाला अहवाल प्राप्त होत नाही, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करणे,वृक्षलागवड व वृक्षसंगोपन,अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे कामे व आराखडा थांबलेला आहे, विविध लाभाच्या योजना अशी सर्व शासकीय कामे शासनाच्या ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबतच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत थांबुन राहिलेली आहेत. यावेळी मधुकर दाते,कानिफनाथ थोरात,संतोष नेवसे,अंकुश जाधव,सविता भुजबळ, अनिल बगाटे, गणेश वालकोळी,कैलास कोळी, धनराज श्रीरसागर,प्रल्हाद पवार,हरिभाऊ पवार,पोपटराव वेताळ,ज्ञानेश्वर पोटे,नवनाथ झोळ,नंदकुमार चव्हाण,माधवी हरपळे व अर्चना चिंधे आदी ग्रामसेवक उपस्थित होते.
शासनाकडे मुख्य मागण्या
१. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे पद रद्द करुन पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करणे
२. ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करणे
३. सुधारित प्रवासभत्ता,ग्रामसेवक शैक्षणिक पात्रता पदविका 12 वी बदलुन पदवीधर करणे
४. २०११च्या जनगणणेनुसार ग्रामविकास अधिकारी सजे निर्माण करणे
५. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दुर करणे
६. सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागु करणे
७. आदर्श ग्रामसेवक एक वेतनवाढ दिली जावी
८. ग्रामसेवकांवरील अतिरिक्त इतर विभागाच्या कामाचा बोजा करणे
2017 मधील आंदोलन आम्ही पुढे घेऊन जात असताना आता सदर मागण्यांना निर्णायक स्वरुप प्राप्त होणे गरजेचे आहे. ग्रामसेवक राज्य संघटनेची मंत्रालय स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असुन आंदोलनावर लवकरच तोडगा निघून मागण्यांबाबत निर्णय अपेक्षित आहे.
- अनिल कुंभार,राज्य कार्याध्यक्ष,ग्रामसेवक संघटना.
ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर सकारात्मक चर्चा सुरु असताना ग्रामसेवकांना आंदोलनापासुन परावृत्त होणेसाठी नो वर्क- नो पेमेंटची भिती जिल्हा स्तरीय प्रशासनाकडुन दाखविण्यात येत असून प्रत्यक्षात मागण्यांना निर्णायक स्वरुप येत नाही तोपर्यंत माघार नाही
- बाळासाहेब गावडे, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, हवेली