शासनाच्या उदासीनतेमुळे हुतात्मा राजगुरु यांच्या वाड्याची उपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:20 AM2018-12-24T01:20:33+5:302018-12-24T01:20:54+5:30

हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ असणाऱ्या त्यांच्या वाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देऊन वीस वर्षे झाली. यादरम्यान अनेकदा या वाड्याचा जीर्णोद्धार करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या.

Due to depression of the Government, the neglect of the palace of martyr Rajguru | शासनाच्या उदासीनतेमुळे हुतात्मा राजगुरु यांच्या वाड्याची उपेक्षा

शासनाच्या उदासीनतेमुळे हुतात्मा राजगुरु यांच्या वाड्याची उपेक्षा

- शिवाजी आतकरी
खेड : हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ असणाऱ्या त्यांच्या वाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देऊन वीस वर्षे झाली. यादरम्यान अनेकदा या वाड्याचा जीर्णोद्धार करण्याच्या अनेक घोषणाही झाल्या. त्यानंतर काही भागांचे सौंदर्यीकरणाचे काम सुुरूही झाले; मात्र ते अनेक कारणांनी अर्धवट अवस्थेत ठप्प झाले. त्यामुळे वाड्यातील राजगुरुंची जन्मखोली व थोरला वाडा वगळता वाड्यातील इतर भिंती, दारे आता जीर्ण होत असून, केवळ केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे हे स्मारक उपेक्षित राहिल्याचे चित्र स्पष्ट होते.

राजगुरुनगरमध्ये हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थळ असणारा वाडा भीमातीरी आहे. युती सरकारच्या काळात साधारणपणे १९९६ च्या सुमारास या वाड्यास संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला. अर्थात त्यासाठी राजगुरुनगरमधील विविध संघटना, तरुण, तत्कालीन पुढारी यांनी केलेली आंदोलने, मागण्या, पाठपुराव्यांचे ते यश होते. राष्ट्रीय स्मारक जरी घोषित झाले तरी या वाड्याच्या जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माणासाठी मोठा पाठपुरावा करावा लागला. अर्थसंकल्पात तरतूद होऊन या कामाची सुरुवात होण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लोटला. मात्र अखेर निधी मंजूर झाल्यावर कामाला सुरवात झाली खरी; मात्र निकृष्ट काम आणि कामातील भ्रष्टाचाराने थोर हुतात्म्याचे स्मारक पुन्हा चर्चेत आले. हुतात्मा स्मारक समिती आणि इतर संघटनांनी वाड्याच्या जीर्णोद्धाराचा विषय प्राधान्याने अजेंड्यावर घेतल्याने पुन्हा निधी उपलब्ध झाला. वाड्यातील राजगुरूंची जन्मखोली सर्वांत आधी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर साधारण ९५ लाख निधीतून थोरला वाडा सागवानी लाकडात उभा करण्यात आला. पुनर्निर्माणातील जन्मखोली व थोरल्या वाड्याचे काम पूर्ण आहे. वाड्याच्या विकास आराखड्यातील इतर कामांना सुरुवातच झाली नाही. विशेष म्हणजे वाडा परिसरातील तेरा कुटुंबांचे पुनर्वसन अथवा मोबदल्याचा विषय शासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील कामांना सुरुवात होऊ शकत नाही. राजगुरूनगरमधील हुतात्मा राजगुरूंचे हे स्मारक राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणास्थान व्हावे, यासाठी राजगुरुनगरवासीयांचा रेटा मोठा आहे. तरीही निर्ढावलेल्या शासकीय यंत्रणेला जाग नसल्याने राजगुरुनगरवासी आता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

विकास आराखड्यातील कामे लवकरच सुरू होतील. राष्ट्रीय स्मारकाचे काम असल्याने ते राष्ट्रीय स्तरावरील एक उत्तम काम व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी थोडा वेळ लागत असला तरी ते काम इतके उत्तम असेल, की हे स्थळ एक प्रेरणास्थळ म्हणून उभे राहील.
- आयुष प्रसाद, सहायक जिल्हाधिकारी, पुणे

भ्रष्टाचाराचा आरोप
स्मारकाच्या उभारणीस दिरंगाई
झालेल्या बांधकामात भ्रष्टाचाराचे आरोप
सरकारी पातळीवरून कमालीची उदासीनता

सद्यस्थिती...
जन्मखोली, थोरल्या वाड्याचे
काम पूर्ण
उर्वरित स्मारकाचे काम रेंगाळले
तेरा कुटुंबांचे पुनर्वसन/ नुकसानभरपाई प्रलंबित

Web Title: Due to depression of the Government, the neglect of the palace of martyr Rajguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे